तीनशे टन निर्माल्याचे होणार खत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया, गोविज्ञान संशोधन संस्था, थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच्छ सेवा सहकारी संस्था, सर्वज्ञ विकास प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिरंगुट येथील साप्ताहिक मिलन, भूगाव, भुकूम, भरे, लवळे, पिरंगुट, पौड, कासारआंबोली, अंबडवेट, शिवणे, कोपरे येथील ग्रामपंचायत यांच्या वतीने गणपती उत्सव काळात सुमारे 300 टन निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. या निर्माल्याचे कंपोस्ट खत तयार करण्याचे काम चालू असून त्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार आहे.

भूगाव (पुणे) : पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया, गोविज्ञान संशोधन संस्था, थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच्छ सेवा सहकारी संस्था, सर्वज्ञ विकास प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिरंगुट येथील साप्ताहिक मिलन, भूगाव, भुकूम, भरे, लवळे, पिरंगुट, पौड, कासारआंबोली, अंबडवेट, शिवणे, कोपरे येथील ग्रामपंचायत यांच्या वतीने गणपती उत्सव काळात सुमारे 300 टन निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. या निर्माल्याचे कंपोस्ट खत तयार करण्याचे काम चालू असून त्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार आहे.

पुणे महानगरपालिकेतील 27 घाट, मुळशीतील आठ घाट तसेच शिवणेतील दोन अशा 37 घाटांवर निर्माल्य संकलनाचे काम या संस्थांमार्फत केले गेले. या उपक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, कमिन्सचे सौमित्र मेहरोत्रा, अवंती कदम, संदीप क्षीरसागर, प्रशांत चितळे, अनिल कुलकर्णी, उमा अय्यर, सहाय्यक आयुक्त संदीप कदम, उपायुक्त उमेश माळी, गोविज्ञान संशोधन संस्थेचे अनिल व्यास, आनंद पाठक, प्रतिष पारखी, राजेंद्र लुंकड, प्रदीप पाटील, अशोक वाळके, स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे प्रिया कचोरीया, तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षकांचे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सुमारे 400 अधिकारी व कर्मचारी या घाटांवर स्वतः पाचव्या व अकराव्या दिवशी विसर्जन घाटावर थांबून लोकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच निर्माल्यदान करण्याचे आवाहन करीत होते. कोथरूड परिसरात रॅली काढून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या निर्माल्य प्रकल्पासाठी लागणारा सर्व खर्च कमिन्स इंडिया फाउंडेशन करीत आहे, अशी माहिती कमिन्सचे प्रकल्प समन्वयक अवंती कदम यांनी दिली.

थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचामार्फत गणेशोत्सवाच्या महिनाभर अगोदर भावी पिढीमध्ये पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. यांतून परिसरात विविध शाळांत मार्गदर्शन शिबिरे, रॅली, स्पर्धांमधून जनजागृती करण्यात आली. तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.

उच्च प्रमाणात सेंद्रिय कार्बन
निर्माल्यापासून खत तयार करण्याचे संपूर्ण काम गोविज्ञान संशोधन संस्थेमार्फत केले जाते. मागील वर्षी याच घाटांवर सुमारे 350 टन निर्माल्य संकलित करून यापासून 175 टन कंपोस्ट खत तयार केले गेले. यावर्षी सुमारे 300 टन निर्माल्य संकलित करून यापासून कंपोस्ट खत तयार होईल. खत तयार करण्यासाठी भारतीय गाईचे शेण व गोमूत्र वापरल्याने मागील वर्षी या खताची लॅबमध्ये तपासणी केली असता यात 27 टक्के एवढ्या उच्च प्रमाणात सेंद्रिय कार्बन आढळून आला.

निर्माल्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत तसेच जमा झालेल्या फळांपासून पिकांसाठी संजीवनी अर्क तयार करण्यात येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी गोआधारीत शेती या विषयावर व खत कसे वापरावे या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेऊन त्यांना मोफत या गोष्टी वाटण्यात येणार आहे. तसेच सहभागी सोसायट्यांमध्येही खत वाटप करण्यात येणार आहे.
- अनिल व्यास, गोविज्ञान संशोधन संस्था

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiative For Clean Environment