"इंजेक्‍टेबल पोलिओ लस'चा देशात दुष्काळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - इंजेक्‍शनद्वारे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने एकेका लसीसाठी पालकांना वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र पुण्यात दिसत आहे. सरकारी यंत्रणांमध्येही या लसींचा खडखडाट असल्याने तोंडावाटे पोलिओ डोस देण्यात येत आहे. 

पुणे - इंजेक्‍शनद्वारे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने एकेका लसीसाठी पालकांना वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र पुण्यात दिसत आहे. सरकारी यंत्रणांमध्येही या लसींचा खडखडाट असल्याने तोंडावाटे पोलिओ डोस देण्यात येत आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पोलिओचा डोस इंजेक्‍शनद्वारे देण्याचा आग्रह धरला, त्याला केंद्र सरकारने प्रतिसाद देत एप्रिलपासून सरकारी लसीकरणामध्येही इंजेक्‍टेबल पोलिओ लस सुरू केली. त्याच वेळी जगभरातून इंजेक्‍शनद्वारे देण्यात येणाऱ्या लसींची मागणी वेगाने वाढली. ही लस उत्पादित करणाऱ्या जगभरात मोजक्‍याच कंपन्या आहेत. तेथील लसींचे उत्पादन आणि वाढलेली मागणी याचे प्रमाण व्यस्त झाल्याने देशात इंजेक्‍टेबल पोलिओ लसींचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

याबाबत भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ""जगभरातून पोलिओच्या लसींची मागणी वाढल्याने पुरवठा विस्कळित झाला आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या देशात जाणवत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्वचेतून (इंट्रा डर्मल) पोलिओचे इंजेक्‍शन देण्याची तडजोड स्वीकारण्यात आली आहे. हा डोस दिल्यानंतरही चार ते सहा आठवड्यांमध्ये इंजेक्‍टेबल पोलिओ द्यावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बालकांना ही लस मिळेल.'' 

राज्याच्या आरोग्य खात्याच्या अतिरिक्त संचालिका डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या, ""इंजेक्‍टेबल पोलिओची लस मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. शिवाय, इतर लसींप्रमाणे पोलिओची लस "दर करार' पद्धतीने मिळत नसल्याने पोलिओचे डोस तोंडावाटे दिले जात आहेत.'' 

पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. एस. टी. परदेशी म्हणाले, ""महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये इंजेक्‍शनद्वारे देण्यात येणारी पोलिओची लस उपलब्ध नाही. गेल्या महिन्याभरापासून ही लस मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. साठा उपलब्ध असेपर्यंत बालकांना ही लस देण्यात आली. मात्र, आता तोंडावाटे पोलिओ डोस दिला जात आहे.'' 

पुण्यातील बहुतांश बालरोगतज्ज्ञ आता लहान मुलांना तोंडातून पोलिओचा डोस देत आहेत. इंजेक्‍टेबल पोलिओसाठी वणवण फिरूनही ती मिळत नसल्याचे शहरातील बालरोगतज्ज्ञांचे मत आहे. 

पोलिओचे "पी 1', "पी 2' आणि "पी 3' हे तीन विषाणू आहेत. तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या लसीमधून फक्त "पी 1' आणि "पी 3' या विषाणूंपासून संरक्षण मिळते. "पी 2'पासून संरक्षण मिळत नसल्याने इंजेक्‍टेबल पोलिओची लस उपलब्ध करून दिली पाहिजे. 
- डॉ. शरद आगरखेडकर, बालरोगतज्ज्ञ

Web Title: Injectable polio vaccine shortages in the country