यापूर्वीच्या सरकारकडून सावरकरांवर अन्याय - देवेंद्र फडणवीस

यापूर्वीच्या सरकारकडून सावरकरांवर अन्याय - देवेंद्र फडणवीस

पुणे - 'देशातील इतिहासकार आणि यापूर्वीच्या सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर निश्‍चितपणे अन्याय केला आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे, त्यांनी कॉंग्रेसपेक्षा वेगळी आपली प्रतिमा जोपासली.

कालपरवापर्यंत, अंदमानातील कारागृहातून त्यांची पाटी काढून टाकण्याचा प्रकार इंग्रजांच्या शाळेत जाऊन शिकलेल्या काहींनी केला. तुम्ही सावरकरांची पाटी काढू शकाल; परंतु भारतीयांच्या मनातून सावरकर कधीच पुसू शकणार नाहीत. खरं तर सावरकर हे एक व्यक्ती नसून ती एक संस्था आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

पुणे महापालिकेतर्फे कर्वे रस्त्यावरील नूतनीकरण केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे आणि अध्यासन केंद्राचे उद्‌घाटन फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर मुकारी अलगुडे, आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, माजी खासदार प्रदीप रावत उपस्थित होते.
सावरकरांचे अतुलनीय शौर्य देशातील कोणीच कधीच विसरू शकत नाही, असे उद्‌गार काढत फडणवीस म्हणाले, 'आपल्या प्रतिभेच्या जोरावर "स्वातंत्र्यवीर' म्हणून त्यांनी जनमानसात प्रतिमा निर्माण केली.

सावरकरांकडे केवळ "स्वातंत्र्यवीर' म्हणून पाहणे हे थोडे संकुचित होईल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. जातिव्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे कृतिशील समाजपरिवर्तनाचे होते. जातिप्रथेविरुद्ध त्यांनी बंड आणि जागरण केले. सावरकरांनी आपल्या व्यवहारातून जातिनिर्मूलनाचे कार्य परमोच्च शिखरावर पोचविले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, जातीच्या आधारावर भेद करता येणार नाही, हे सावरकरांनी ठासून सांगितले. त्यांनी मराठी भाषेला खऱ्या अर्थाने समृद्ध केले. भारताच्या आंतरिक स्वातंत्र्याला असणारे धोके त्यांनी ओळखले होते. बाह्य आणि आंतरिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काय करता येईल, असे विचार त्यांनी मांडले.''

स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी महापालिका आणि विवेक व्यासपीठ यांची राहणार आहे. सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले.

उद्‌घाटनाला जायचे नाही, असा आदेश नाही
'स्मारकाच्या उद्‌घाटनाला जायचे नाही, असा कुठलाही आदेश मला देण्यात आलेला नाही,'' असे कार्यक्रमाच्या सुरवातीला सांगत महापौर जगताप यांनी प्रास्ताविक सुरू केले. 'आजवर मी कधीही स्वातंत्र्यवीरांना दोन गटांत विभागले नाही,'' असेही जगताप आवर्जून म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com