
Maitreya Dadashreeji : आध्यात्मिकतेच्या माध्यमातूनच आंतरिक परिवर्तन
पुणे : ‘‘आगामी काळ सर्वांना उन्नतीची संधी देणारा असून त्यासाठी स्वतःमध्ये बदल करून घ्यावे लागतील. आपली संस्कृती आणि आध्यात्मिकतेच्या माध्यमातून स्वतःचा शोध घेत आंतरिक परिवर्तन करावे लागेल,’’ असे प्रतिपादन मैत्रीबोध परिवार व आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक मैत्रेय दादाश्री यांनी केले.
मैत्रीबोध परिवाराच्यावतीने कर्जत (जि. रायगड) येथील शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात आयोजित विशेष कार्यक्रमात दादाश्री बोलत होते. मैत्रीबोध परिवारातर्फे २७ डिसेंबर हा दिवस नि:स्वार्थ सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी उपस्थित साधकांपैकी काहींनी अनुभव सांगितले. दादाश्री म्हणाले, ‘‘सत्य हे अनुभवावर आधारित असते.
आपल्याला मोठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा लाभली असून त्या आधारेच खंबीरपणे उभे आहोत. कोणत्याही अपेक्षेशिवाय काही मागणे म्हणजे निःस्वार्थ सेवा होय. सद्यःस्थितीत सर्वत्र असंतोष दिसत आहे. यामध्ये सत्य सांगणाराच पुढे जाणार आहे. सत्याचा शोध घेऊन प्रेमभाव निर्माण करावा लागणार आहे.
प्रेमामध्ये सर्वोच्च शक्ती असते. स्वतःचा शोध घेतल्याशिवाय सत्य दिसणार नाही. विचारांवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळविल्याशिवाय परमशांती अनुभवता येणार नाही. प्रगतीसाठी शहरात गेलेल्यांना आता मानसिक शांतीसाठी गावाची ओढ लागली आहे. परिवर्तनाचा हा संदेश आहे.’’
यावेळी गुरुकुल आणि परिसरातील जिल्हापरिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.वैदिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड मैत्रेय दादाश्री म्हणाले, देश आणि विश्वाचे भविष्य युवा पिढीवर अवलंबून आहे. वैदिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान दोन्हींची सांगड घालून मुलांना शिक्षण दिले पाहिजे.
त्यासाठी मैत्रीबोध परिवाराकडून स्नेहसंस्कार गुरुकुल सुरू केले आहेत. गाईंच्या संगोपनासाठी कामधेनू गोधाम सुरू केले आहे. राष्ट्राच्या विकासाला तंत्रज्ञान, प्रगती आणि आर्थिक विकासाने मोजले जाते. आता प्रगती आणि विकासाच्या परिभाषेत आपल्या सभोवती असणाऱ्या लोकांच्या जीवनाबद्दलची करुणा आणि सेवाभाव यालाही सामावून घेण्याची वेळ आली आहे.’’