दारुची नशा निष्पापाच्या जीवावर बेतली

मिलिंद संगई 
रविवार, 9 डिसेंबर 2018

बारामती : दारुच्या नशेत गाडी चालवून एका तेरावर्षीय निष्पाप मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल शहर पोलिसांनी तिघांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. 

बारामती : दारुच्या नशेत गाडी चालवून एका तेरावर्षीय निष्पाप मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल शहर पोलिसांनी तिघांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. 

बारामती शहरात हॉटेल नीलम पॅलेसनजिक काल रात्री अकराच्या सुमारास गणेश पोपट शहाणे (रा. कसबा, बारामती), सोमनाथ अनिल लोळगे (रा. कोष्टीगल्ली, बारामती) व जितेंद्र गणपतराव भोसले (रा. माळेगाव, भोसलेवस्ती, बारामती) हे तिघे स्विफ्ट गाडी( क्रमांक एमएच 42- के- 9997) मधून दारु पिऊन बारामतीकडे येत होते. नीलम पॅलेसनजिक गतीरोधकाचा अंदाज न आल्याने त्यांनी अचानक ब्रेक मारल्याने गाडीने दोनदा पलटी मारली. रस्त्याच्या कडेला सायकल घेऊन थांबलेल्या साकीब गालिब सय्यद या मुलाच्या अंगावर ही गाडी जाऊन पडल्याने तो गंभीर जखमी झाला. दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. 

या नंतर संतप्त जमावाने या तिघांना चोप देण्याचा प्रयत्न केला, मात्र फौजदार सुभाष मुंडे व सहकारी तेथे पोहोचल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशीरा त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या गाडीत दारुच्या बाटल्या व ग्लासही मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सय्यद कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर....
काळ एका क्षणात धावून येतो, याचा प्रत्यय सय्यद कुटुंबियांना काल रात्री आला. रस्त्याच्या कडेला सायकल घेऊन थांबलेल्या व आठवीत शिकत असलेल्या तेरा वर्षीय साकीबला दारु पिऊन गाडी चालवत असलेल्या तिघांच्या चुकीमुळे एका क्षणात जीव गमवावा लागला. ही घटना इतक्या क्षणार्धात घडली की कोणाला काही समजेपर्यंत साकिब गंभीर जखमी झाला होता. दारुच्या नशेत तर्र असलेल्या या तिघांना गाडीने दोन पलट्या घेतल्यावरही नेमके काय झालय हे समजत नव्हते. एकुलता एक मुलगा असलेल्या गालिब सय्यद यांच्यावर तर या घटनेने दुःखाचा डोंगरच कोसळला. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि सर्वांचा साकिब या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. 

दारुच्या नशेत गाडी चालविण्याची शिक्षा निष्पाप जीवाला....
एका ढाब्यावर जेवण करुन दारु पिऊन गणेश शहाणे, सोमनाथ लोळगे व जितेंद्र भोसले बारामतीकडे निघाले होते. गाडी चालविण्यासारखी त्यांची अवस्था नसतानाही ते तशाच अवस्थेत गाडी चालवित असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी नमूद केले. या तिघांच्या दारुच्या नशेची किंमत साकिबसारख्या एका निष्पाप जीवाला चुकवावी लागल्याने आज बारामतीवर शोककळा पसरली होती. 

 

Web Title: innocent loss life due drink and drive