सायबर गुन्ह्यांचा तपास अधांतरी

संदीप घिसे
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

पिंपरी - हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्क पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात आहेत. तसेच, शहरातील बहुतांश नागरिकांकडून ऑनलाइन खरेदी, नेट बॅंकिंग, डेबिट- क्रेडिट कार्डचा वापर, सरकारच्या इतर सेवांचा ऑनलाइन वापर होत आहे. सायबर गुन्ह्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालय कार्यान्वित झाल्यापासून पुणे पोलिसांनी पिंपरी- चिंचवडमधील सायबरविषयक गुन्ह्यांचा तपास करण्यास नकार दिला आहे. पिंपरी आयुक्‍तालयातही तपासासाठी सायबर लॅब नसल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास अधांतरीच राहिला आहे.

डिजिटल इंडियाची हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिली. तसेच, पंतप्रधानांनी नोटाबंदी केल्यावर ऑनलाइन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, सायबर सुरक्षेविषयी योग्य ती खबरदारी नागरिक व प्रशासन घेत नसल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कधी बक्षीस लागल्याचे सांगत, तर कधी आम्ही बॅंकेतून बोलत आहोत, तुमच्या एटीएम कार्डाची मुदत संपली असल्याचे सांगून ओटीपी क्रमांक घेऊन नागरिकांची फसवणूक होत आहे; तर दुसरीकडे एटीएम कार्ड क्‍लोनिंग करून त्याद्वारे बॅंकेतील पैसे रातोरात खात्यातून गायब होत आहेत. महिलांची फेसबुकवरून बदनामी करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. 

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालय १५ ऑगस्टपासून कार्यान्वित झाले. त्यानंतर काही दिवस पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून पिंपरी- चिंचवडमधील सायबर गुन्ह्यांचा तपास केला. मात्र, आता ते करण्यास तयार नाहीत. ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी घेऊन गेलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी पाठविले जात आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी येतात. पोलिसही ऑनलाइन फसवणुकीची तक्रार घेतात. मात्र, पुढील तपास कसा करायचा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबरविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत. तसेच, सायबर सेलचा तात्पुरता पदभार गुन्हे शाखा युनिट दोनचे निरीक्षक सुधाकर काटे यांच्याकडे दिला आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सायबर लॅब सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच, गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्‍यकता वाटल्यास पुणे सायबर विभागाचेही सहकार्य घेऊ.
- सतीश पाटील,  सहायक आयुक्‍त, गुन्हे शाखा

Web Title: Inquiries of cyber crimes