कृषी उद्योजकतेचा दीपस्तंभ

Bhavana-Shende
Bhavana-Shende

आज चारा पिकांची पंधरा एकर शेती आणि शंभरहून अधिक जनावरांचा मुक्तसंचार पद्धतीचा आधुनिक गोठा यशस्वीरीत्या सांभाळण्याचे काम कडूस येथील सौ. भावना अभिजित शेंडे यांनी केले आहे. त्यांनी केलेली कृषी उद्योजकतेची घोडदौड इतर महिलांसाठी दीपस्तंभ ठरली आहे.

माझ्या लहानपणी आई-वडील कापड दुकान चालवत होते. यामुळे व्यापार व व्यावसायिकतेचे बाळकडू आई-वडिलांकडून निश्‍चितच मिळाले. लग्न झाल्यावर काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण त्यासाठी संधी हवी होती. तसे पाहिले तर सासरची पार्श्‍वभूमी थोडी राजकीय क्षेत्रातील. पण पती अभिजित यांना शेती व दुग्ध व्यवसायाची विशेष आवड असल्यामुळे सर्वांच्या संमतीने सौ. भावना यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनाच्या व्यवसायाची निवड केली. शेती व खास करून दुग्ध व्यवसाय करत असताना सर्वसामान्य शेतकरी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जातो व त्यावर कशी मात करता येईल याचे प्रथमतः त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर आपल्या सासरी असणाऱ्या एका गाईपासून सुरू केलेल्या या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे. 

आज पंधरा एकर चारा पिकांची शेती आणि शंभरहून अधिक जनावरांचा मुक्त संचार पद्धतीचा आधुनिक गोठा यशस्वीरीत्या सांभाळण्याचे काम त्या करीत असून ‘अभा डेअरी फार्म’च्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीचा व्यवसाय उभा केला आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात ५० गाई, २५ कालवडी आणि २५ म्हशी आहेत. या जनावरांच्या संगोपनाचे व्यवस्थापन सौ. भावना करीत आहेत. त्यांचे पती अभिजित यांचे त्यांना भक्कम पाठबळ मिळत आहे. कृषी व पशुवैद्यकीय विभागाकडील विविध योजनांची माहिती व अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आपला व्यवसाय वृद्धिंगत केला आहे.

उच्च प्रतीचा चारा व पशुखाद्य जनावरांसाठी उपलब्ध केल्यामुळे गोठ्यात संगोपन केल्या जाणाऱ्या गाई, म्हशी, कालवडी यांची दूध देण्याची व पैदाशीची क्षमता निश्‍चितच विकसित होते, हे जाणून शाश्‍वत चारानिर्मितीसाठी मुरघास निर्मितीचे युनिटदेखील सुरू केले आहे. यात दररोज ८ ते १० टन मक्‍यापासून मुरघासाची निर्मिती या ठिकाणी केली जाते व त्याचे पॅकिंग पण केले जाते. त्यांच्या या व्यवसायाने देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. स्वतः मका उत्पादन घेतात, तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून सुद्धा मका घेतले जाते. उत्पादित केलेल्या मका पिकाला बाजारपेठ उपलब्ध झाल्याने व पैसा मिळत असल्याने परिसरातील बेरोजगार तरुण शेतकरी मका पिकाकडे वळला आहे. यातून परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची निर्मिती झाली आहे, तसेच पशुपालकांना पौष्टिक मुरघास मिळण्याचे ठिकाण मिळाले आहे. कटिंग व पॅकिंग केलेला मुरघास परिसरात लोकप्रिय झाला आहे. मक्‍याची करार शेती विकसित करण्याचा सौ. भावना यांचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या चारा पिकांना हमीभाव उपलब्ध करून दिला, तर हा या व्यवसायातील एक मैलाचा दगड ठरणार आहे आणि या दृष्टीने त्यांचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत. 

याशिवाय सद्यस्थितीत दुधाला मिळणाऱ्या कमी भावाला कायमस्वरूपी उत्तर शोधण्यासाठी ते स्वच्छ व निर्मळ उत्पादित केले पाहिजे. गोठ्यात उत्पादित झालेल्या दुधापासून त्यांनी ‘अभा डेअरी फार्म’ हा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीचा प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. सध्या त्यांच्याकडे खवा, पनीर, दही, ताक, लस्सी, क्रीम या सर्व पदार्थांचे उत्पादन केले जाते.

विशेष म्हणजे त्यांच्याकडे तयार केल्या जाणाऱ्या देशी गाईच्या तुपाला परराज्यातून देखील मोठी मागणी आहे. चाकण या ठिकाणी त्यांनी डेअरी फार्मचे स्वतःचे आउटलेट सुरू केले आहे. फार्मवर उत्पादित माल त्या ठिकाणी नेला जातो व त्याची विक्री केली जाते. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरल्यामुळे त्यांच्या सर्व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. सध्या एकच विक्री केंद्र असले तरी दोन ते तीन ठिकाणी विक्री केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरी भागाचा विचार त्यांच्याकडून सुरू आहे. जनावरांना चारा म्हणजे मुरघास निर्मिती करणे व ग्राहकांना स्वच्छ व निर्मळ दूध उपलब्ध करून देणे हे एकच ध्येय त्यांनी ठेवले आहे. त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपये आहे. ‘आई आपल्या मुलाला फारतर दोन ते तीन वर्षे दूध पाजते. परंतु गाई मानवी देहाला त्याच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत दूध उपलब्ध करून देते, त्यामुळे ‘आई नंतर गाई’ ही म्हण अत्यंत मौलिक असून, गाय ही जपलीच पाहिजे,’ असे त्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com