जिद्द, आत्मविश्र्वासाने खांद्यावर तीन स्टार

Deepmala-Hire Kale
Deepmala-Hire Kale

माझ्या वडिलांनी दाखवलेले स्वप्न व आत्मविश्वास यामुळेच मी आज माझ्या खांद्यावर अभिमानाचे तीन स्टार लावू शकले शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, ‘‘अबला नाही सबला है तू, नारी नाही चिंगारी है तू’’. मुंबईत कामाचा प्रचंड ताण आहे. त्यातून मनासारख्या केलेल्या कामाचा आनंदही मिळतो.

पेठ (ता. आंबेगाव) या खेडे गावात अतिशय गरीब परिस्थितीत माझे शिक्षण झाले. अतिशय खडतर परिस्थितीत आम्ही चारही बहिणी शिक्षण घेत होतो. आई वडिलांनी अपार कष्ट करून स्वतः उपाशी राहून, मोलमजुरी करून आम्हाला शिकविले. एक दिवस ह्या सगळ्यांचे सार्थक होईल या एकाच आशेवर जीवनाची वाटचाल करत होतो. माझे वडील विलास किसन हिरे हे पेठ या गावचे पोलिस पाटील. त्यांचा सतत पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क येत असे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाहिले की त्यांचा उर अभिमानाने भरून येत होते. हे स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिले. नवा आत्मविश्वास त्यांनी मला दिला. माझे वडीलच माझे मार्गदर्शक व प्रेरणा स्थान आहेत. 

मी पदवीचे शिक्षण राजगुरुनगर येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी लगेच मला स्टडी सर्कल सदाशिव पेठ पुणे येथे राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी पाठवले. तेथील खर्च आम्हाला पेलणारा नव्हता, परंतु त्यांनी कोणताही विचार न करता सगळ्या खर्चाची तजवीज केली. मी अल्पशः पगाराची एक नोकरी शोधली. आई वडील आपल्यासाठी गावाकडे राहतात हा विचार सतत मनात ठेवून अहोरात्र कष्ट केले. अभ्यासिका, लायब्ररी यामध्ये स्वतःला गुंतवून घेतले. दिवस रात्र अभ्यास करून अधिकारी पदावर जायचंच. हा निर्धार केला. त्याच दरम्यान पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी जाहिरात आली. हातात काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं फार गजरेच आहे. हा विचार करून पोलिस कॉन्स्टेबल म्हणून पुण्यात रुजू झाले. 

आपले हे ध्येय नाहीच हा विचार मनात ठेवून राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. वर्षभरात खूपच चांगल्या गुणांनी PSI म्हणून सिलेक्‍शन झाले. हे आई- वडिलांना कळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वडिलांनी मला जे स्वप्न दाखवले होते ते सत्यात उतरताना पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.  ‘‘याच दिवसासाठी केला होता सारा अट्टहास’’ अशी त्यांची भावना होती. 

सध्या बोरिवली- मुंबई येथील पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर काम करताना खूप अनुभव येतात. त्या वेळी आपले गाव व खेड्यातील साध्या - भोळ्या प्रेमळ निर्मळ मनाची माणसं आठवतात. 
माझे पती शरद काळे (MSC Agri) यांची मोलाची साथ मला मिळाली. सासू सासरे यांचाही चांगला पाठिंबा मिळाला. सासरे मल्हारी काळे यांचे प्रशासनाबाबत खूप चांगले मार्गदर्शन मिळते. दोन अतिशय गौरहरी व गौरकृष्ण गोड मुले आहेत. त्यांचे संगोपन करत नोकरीची धुरा समर्थपणे सांभाळते. पती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. 

माझ्या वडिलांनी दाखवलेले स्वप्न व आत्मविश्वास यामुळेच मी आज माझ्या खांद्यावर अभिमानाचे तीन स्टार लावू शकले शेवटी एवढेच सांगावेसे वाटते ‘‘अबला नाही सबला है तू, नारी नाही चिंगारी है तू’’

कामाचे समाधान...
वडील पोलिस पाटील. त्यामुळे लहानपणापासून पोलिस खात्याशी संबंधित असलेल्या अनेक घटनांची माहिती मिळत गेली. मुंबई मध्ये पोलिस ठाण्यात काम करत असताना सतत वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. अपघाताची माहिती घेत असतानाच सोन्याचे दागिने लांबविल्याची करुण कहाणी ऐकून घ्यावी लागते. संबंधित महिलेला धीर देत असतानाच मारामारी करून एकमेकांच्या समोर तक्रारी देण्यासाठी तावातावाने आलेल्यांनाही शांत करावे लागते. अपघातात मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाला. मृतदेहाची ओळख पटविणे फार अवघड झाले होते. पण हातामध्ये बांधलेल्या देवाच्या दोऱ्याचा पाठपुरावा करत योग्य पद्धतीने तपास केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या पत्नीपर्यंत पोचता आले. असे काम करत असताना वेगवेगळ्या प्रसंगांचा अनुभव येत असतो. मुंबईमध्ये पोलिस दलाला कामाचा प्रचंड ताण आहे. त्यातून मनासारख्या केलेल्या कामाचा आनंदही व समाधानही मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com