ध्यास महिलांच्या सक्षमीकरणाचा...

Gauri-Bhapkar
Gauri-Bhapkar

सन २०११ मध्ये एकवीरा महिला बचत गट स्थापन केला. सुरवातीला पंचवीस महिलांबरोबर सुरू केलेली बचत गटाची चळवळ आठशे महिलांवर गेली. मलाच काय माझ्यासारख्या आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक महिलांच्या हातात आता स्वतःच्या हक्काचा पैसा खेळू लागला.

सन २००७ च्या आसपासचा कालावधी माझ्या आयुष्यातील खूप खराब होता. आर्थिक विवंचनेत होते. लोकांची दारे ठोठावली. पण मदत कुणी केली नाही.

आपल्या खिशात पैसे नाहीत तर जगाकडे पैसे नाहीत याची जाणीव मला आईवडिलांनी करून दिली. मग मीच स्वतःच्या पायावर उभे राहायचा निर्धार केला. सन २०११ मध्ये एकवीरा महिला बचत गट स्थापन केला. सुरवातीला पंचवीस महिलांबरोबर सुरू केलेली बचत गटाची चळवळ आठशे महिलांवर गेली. मलाच काय माझ्यासारख्या आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक महिलांच्या हातात आता स्वतःच्या हक्काचा पैसा खेळू लागला. माझ्या आणि माझ्या सहकारी महिलांसाठी ही अभिमानाची बाब ठरली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या आळंदीत माझा जन्म झाला. लहानपणीचा काळ माझा मजेत गेला. मात्र अचानक घरची आर्थिक परिस्थिती थोडी खालावली. माझे शिक्षण जेमतेम झाले. आईवडिलांनी मला कधीही कोणते ही काम करू नको असे म्हटले नाही.

केलेल्या प्रत्येक कामात आईवडिलांनी आधार आणि खंबीर पाठबळ दिले. आई वडिलांच्या दृष्टीने मी कायमच त्यांचा मुलगा होते आणि आजही ते मला मुलगी नाही तर मुलगाच मानतात. आई वडिलांचे प्रेम आणि पती अजय भापकर यांनी टाकलेला संपूर्ण विश्वास यामुळे मला सामाजिक काम करण्यास हुरूप मिळाला. 

राजकारण नाही तर समाजातील कष्टकरी लोकांसाठी काही तरी कर असा सल्ला माझ्या कुटुंबीयांकडून नेहमीच मिळतो. राजकारण चांगले नाही त्यापेक्षा महिलांसाठी काही कर या भावनेतूनच बचत गटाची चळवळ उभी केली. प्रत्येक महिला, तिला आधार असो किंवा नसो, तिने स्वावलंबी बनलेच पाहिजे ही माझी इच्छा. आळंदी आणि पंचक्रोशीत सांस्कृतिक अथवा महिलांशी निगडित कार्यक्रम असला की संपर्कात राहायचे. माझ्या कुटुंबाकडून आणि समाजाकडून बरेच काही शिकायला मिळाले. नवनवीन कार्यक्रम घेण्याची कल्पना सुचू लागली. बचत गटाच्या माध्यमातून गरीब महिलांसाठी आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी मदत केली.

टपरी, पडदा, गादी बनविण्याच्या दुकानास मदत केली. हातगाड्यांसाठी आर्थिक मदत केली. आळंदी परिसरात औद्योगिक भाग असल्याने कामगार वर्गाची संख्या लक्षणीय. मग कामगारांना जेवणाचे डबे पुरविण्यासाठी महिलांना उद्युक्त करून खानावळ काढण्यासाठी आर्थिक मदत केली. 

कष्टकरी महिला एकत्र याव्यात आणि सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांशी शेअर कराव्यात यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. पाच वर्षांपासून कोजागरी पौर्णिमेला रासगरब्याचे कार्यक्रम आयोजित करते. ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करून समाजात कष्ट करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या आणि मुलांचे आयुष्य घडविणाऱ्या महिलांना आणखी बळ देण्यासाठी पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. सर्व स्तरावरील महिलांना एकत्र करून गावजत्रेचा कार्यक्रम आयोजित केला. 

लोकांशी असलेल्या सततच्या संपर्कामुळे जनमानसात टिकून राहणे जमले. सर्व पक्षातील लोकांशी, कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी सलोखा ठेवला. महिलांच्या समस्या मग त्या कौटुंबिक असो वा सामाजिक, त्या सोडविण्याची आवड असल्याने सातत्याने पुढाकार घेते. 

निव्वळ कौटुंबिक समस्या नाही तर महिलांचे जीवन सुसह्य व्हावे. महिला सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे यासाठी व्याखाने, शिबिरे आयोजित केली. हिमोग्लोबिन तपासणी, फिजिओथेरपी यासाठी स्थानिक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना बरोबर घेत महिलांसाठी शिबिरे घेतली. महिलांना एकत्र येण्यासाठी एकत्रित व्यासपीठ मिळवून देत हळदी कूंकवासारखे समारंभ आयोजित केले. 

सर्वांशी प्रेमाने वागून संबंध टिकवून ठेवायचे हा माझा स्थायी स्वभाव. खोटेपणाची चीड असल्याने कायमच स्पष्टपणा माझ्या वागण्यात राहिला. जिवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी मला मिळाल्या. २०१३ मध्ये पत्रकार म्हणून काम सुरू केले. नवे क्षेत्र मिळाले. समाजात दुःखे सर्वांनाच आहे. मात्र दुःख कवटाळत न बसता त्यावर मात करायची हा मंत्र आईवडील आणि पतीकडून मिळाला. आता वृद्धांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा मानस आहे. सेवा परमो धर्म हाच माझ्या जगण्याचा मंत्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com