घर प्रपंचाबरोबरच गावाचा कारभारही

अंकुश शेळके
शुक्रवार, 15 मार्च 2019

गावचा प्रपंच करीत असताना इंदूबाईंना स्वत:चा घर प्रपंचदेखील तितक्‍याच नेटाने उभा केला आहे. दोन्ही मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडेवाटप असे विविध उपक्रम राबवितात.

गावचा प्रपंच करीत असताना इंदूबाईंना स्वत:चा घर प्रपंचदेखील तितक्‍याच नेटाने उभा केला आहे. दोन्ही मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडेवाटप असे विविध उपक्रम राबवितात.

पतीच्या निधनानंतर सर्वसाधारणपणे महिलेचे जीवन निराशेचे होते. परंतु या दु:खातून सावरत वासुली (ता. खेड) येथील इंदुबाई बबन शेळके यांनी मोठ्या जिद्दीने आपला घर प्रपंच उभारला, तसाच गावचा कारभारदेखील तितक्‍याच नेटाने सांभाळत आहेत.

वासुली हे चाकण एमआयडीसीमधील महत्त्वाचे गाव आहे. गावाने विश्‍वास ठेवून सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर आजतागायत या विश्वासाला तडा न जाऊ देता शेळके यांनी गावात विविध विकासकामे राबवून महिला ही अबला नसून सबला आहे, याचे उदाहरण दिले आहे.

गावची धुरा सांभाळण्याची वेळ आल्यानंतर इंदूबाई शेळके यांनी गावच्या विकास प्रक्रियेत दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. आपल्या अवघ्या साडेतीन वर्षाच्या सरपंचपदाच्या काळात जवळपास एक कोटी रुपये बजेट असणारा वासुली सुदुंबरे रस्ता, अंतर्गत सिमेंट रस्ते, शाळा आरसीसी इमारत, भव्य सभामंडप, समशान भूमी, ठाकरवाडी पाणी योजना, दलित वस्ती अंतर्गत रस्ता, याशिवाय प्रत्येक वस्तीवर घर तेथे पथदिवे, गाव विहीर दुरुस्ती, शाळा बांधकाम आणि वॉल कंपाऊंड, डिजिटल शाळा, पाणी शुद्धीकरण यंत्र यांसारख्या सुविधा गावात राबविल्या. 

याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून काम करीत असताना महिलांना एकत्र जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम शेळके यांनी केले आहे. गावच्या विकासात महत्त्वाचे काम म्हणजे मागेल त्याला पक्का रस्ता देण्याचे अभिनव काम ताईंनी त्यांच्या सरपंच पदाच्या काळात सहकऱ्यांना बरोबर घेऊन केले आहे.

पुढील काळात भव्य असे आरसीसी ग्रामपंचायत कार्यालय उभारणे, स्मशानभूमी रस्ता करणे आणि परिसरात सुशोभीकरण करणे, याशिवाय कचरा व्यवस्थापन करण्यासाठी घंटागाडी उपलब्ध करणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याद्वारे खतनिर्मिती करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे इंदूबाई शेळके यांनी सांगितले.

गावचा प्रपंच करीत असताना इंदूबाईंना स्वत:चा घर प्रपंचदेखील तितक्‍याच नेटाने उभा केला आहे. दोन्ही मुलांना स्वतःच्या पायांवर उभे करून स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यांची दोन्ही मुले विशाल आणि सोमनाथ हे दोघे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. याशिवाय कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडेवाटप असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Indubai Shelake on the occasion of womens day