शेती आणि उद्योग सांभाळणारे व्यक्तिमत्त्व

विनायक घुमटकर
शुक्रवार, 15 मार्च 2019

जयश्रीताईंनी पतीसमवेत शेतीचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. शेतीमध्ये आयुष्यभर खूप कष्ट घेतले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. परिस्थिती कठीण असताना, कुणाच्याही आधाराविना दोन्ही मुलांना घेऊन नव्या पर्वाकडे वाटचाल केली.

जयश्रीताईंनी पतीसमवेत शेतीचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. शेतीमध्ये आयुष्यभर खूप कष्ट घेतले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. परिस्थिती कठीण असताना, कुणाच्याही आधाराविना दोन्ही मुलांना घेऊन नव्या पर्वाकडे वाटचाल केली.

कै. नारायण बळवंत घुमटकर उपाख्य माळी फौजदार हे खेड तालुक्‍यातील त्या काळचे सुपरिचित नाव! राजगुरुनगरमध्ये त्यांची चांगली शेतजमीन होती. तत्कालीन समाजाचे नेते, पुणे येथील कै. गणेश हरी दरोडे यांच्या मध्यस्थीने माळी फौजदारांचे चिरंजीव शूरसेन घुमटकर यांच्याशी पूर्वाश्रमीच्या जयश्री चंद्रसेन बोडके यांचा विवाह झाला. वडील चंद्रसेन गणपत बोडके, मुंबई येथील भायखळ्याच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये फळांचा व्यापार करीत होते. त्यामुळे जयश्रीताईंचे विवाहापूर्वीचे आयुष्य मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये गेले. बहुतांश शिक्षण पुणे येथे झाले. त्यामुळे ग्रामीण भागाचा गंधही नाही. मात्र लग्नानंतर परिस्थिती बदलली. आज शहर झाले असले तरी त्या काळी गावस्वरूप असलेल्या राजगुरूनगर येथे सूनबाई म्हणून त्या आल्या.

पती शूरसेन घुमटकर यांचा शेती हाच व्यवसाय होता. विवाहपूर्वीचे आयुष्य मुंबई व पुणे येथे गेलेले असूनही, जयश्रीताईंनी पतीसमवेत शेतीचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. शेतीमध्ये आयुष्यभर खूप कष्ट घेतले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. शेतजमीन चांगली असली, तरी आयुष्य हे सामान्य शेतकऱ्यांप्रमाणे खडतर व कष्टमय होते. त्या खडतर दिवसांमध्ये त्यांनी पतीला अतिशय भक्कम व मोलाची साथ दिली. त्यांना विनायक व वैभव ही दोन मुले आहेत.

पती शूरसेन घुमटकर यांना मेंदूचा कर्करोग झाला. त्यातच त्यांचे १९९५ मध्ये निधन झाले. कुटुंबावर कोसळलेल्या या संकटाचा त्यांनी मोठ्या धिराने सामना केला. परिस्थिती अधिक कठीण असताना, कुणाच्याही आधाराविना दोन्ही मुलांना घेऊन एका नव्या पर्वाकडे वाटचाल सुरू केली. पतीच्या निधनाचे दुःख विसरून विस्कटलेला संसार मुलांच्या माध्यमातून पुन्हा उभा केला. एकाचवेळी शेती आणि घर सांभाळत मुलांचे शिक्षण पार पाडले. मोठा मुलगा विनायक व धाकटा मुलगा वैभव यांना राजगुरुनगर येथे स्टील व सिमेंटचे दुकान सुरू करून दिले. या व्यवसायात मुलांचा चांगला जम बसल्यानंतर त्यांना राजगुरुनगर येथे बांधकाम व्यवसाय सुरू करण्यासाठी खंबीर पाठबळ दिले. दुसऱ्या बाजूला त्यांनी स्वतः शेतीमध्ये चांगल्या सुधारणा करीत वाढ केली.

सासरे माळी फौजदार यांचे समाजात चांगले काम होते. मात्र संसाराचा गाडा ओढताना या दांपत्याला समाजाच्या कामासाठी तेवढा वेळ मिळाला नाही. तरी समाजाचे देखील आपण देणे लागतो या भावनेतून मुलांना मात्र समाजकारणाचे धडे दिले. त्यामुळेच मोठा मुलगा विनायक लहान वयातच राजगुरुनगर ग्रामपंचायतचा सदस्य झाला. त्यानंतर राजगुरुनगर सहकारी बॅंकेचा संचालक म्हणून निवडून आला. सध्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, खेड तालुका खरेदी विक्री संघ, सिद्धेश्‍वर विविध कार्यकारी सोसायटी या ठिकाणी विनायक संचालक म्हणून काम करीत आहे. तसेच धाकटा मुलगा वैभव हा खेड तालुका खादी ग्रामोद्योग संघाचा माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून काम करीत आहे.

राजगुरुनगर नगर परिषदेने मंजूर करून आणलेल्या नवीन पाणीयोजनेकरीता पाण्याची टाकी बांधण्याकरिता, स्वतःची पाच गुंठे जागा विनामोबदला बक्षीसपत्र करून दिली. आज दोन्ही मुले व्यवसायात तसेच समाजामध्ये चांगल्या प्रकारे स्थिरसावर झाल्यावर जयश्रीताई काहीशा निवांत झाल्या आहेत. फिरण्याची आवड असल्याने, नातेवाईक तसेच मैत्रिणींचा समवयस्क ग्रुप करून गेल्या काही वर्षांत जगभ्रमंती केली. सिंगापूर, मलेशिया, दुबई, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, जपान, नॉर्वे, स्वीडन, बॅंकॉक, जर्मनी, स्वित्झर्लंड,  इंग्लंड, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस असे अनेक देश पाहिले. तसेच त्यांची भारतामधील बहुतेक प्रेक्षणीय स्थळे पाहून झालेली आहेत. खडतर परिस्थीतून आज अतिशय चांगले दिवस आल्याने त्या समाधानी आहेत. मुलांना प्रत्येकी एक-एक मुलगा असून नातवंडांसोबत त्या रमून गेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Jayashri Ghumatkar on the occasion of womens day