सहप्रवासाचे लिखाण आणि समाजकार्यही

Kamal-Padwal
Kamal-Padwal

मुलांसाठी, आप्तस्वकीयांसाठी मला सावरणे भाग होतेच आणि म्हणून सुरू झाला ‘सहप्रवास’. ‘सहप्रवासाचे लिखाण’ व सुरू केले थोडे समाज कार्य. गरजवंतांना यथाशक्ती मदत, अनाथ मुलांच्या आश्रमाला मदत, आप्तस्वकीयांबरोबर प्रेमाने वागणे, धार्मिक शैक्षणिक कार्यात यथायोग्य मदत केली.

मी माहेरची कमल जिजाबा आवटे. डोंगराच्या कुशीत राहणारे आमचे सुखी कुटुंब. तेथेच ठाकरवस्ती, देसवळासाठी प्राथमिक शाळा होती. त्या शाळेत मी जाऊ लागले. ठाकर समाजाच्या मुलांसोबत मी शाळेत अक्षर गिरवू लागले. नंतर २ ते ४ मुली शाळेत येऊ लागल्याने आमचा वर्ग सुरू झाला. आम्ही मुली महाळुंगे पडवळ गावातील मराठी शाळेत इयत्ता पाचवीत जाऊ लागलो. मुलींची शाळा सुरू होऊन आमचे वेगळे विश्‍व तयार झाले. 

शिक्षकांनीच मला वाचनाची आवड निर्माण करून खेळात भाग घ्यायला लावून स्वावलंबी बनविले. समृद्ध ग्रंथालयातील शिक्षक मला सतत चांगली पुस्तके वाचायला देत. त्यामुळे विचारांची प्रगल्भता वाढली. विं. दा. करंदीकर यांचा ‘मृद्‌गंध’ मी नववीत वाचून काढला. त्यावेळेस समजला नाही म्हणून परत वाचला आणि करंदीकर काव्यसंग्रहातून अनुभवले. माध्यमिक शिक्षण संपले. पुढे काय तर लग्न ! योगायोगानेच गावातीलच सुस्थितीत असलेल्या पडवळ कुटुंबातील कृषी खात्यात असलेले नाथा पडवळ यांच्याशी दादाने आणि मुख्याध्यापक शिवाजीराव पाटील यांनी विवाह निश्‍चित करून कमी खर्चात पार पाडला. मी कमल नाथा पडवळ झाले. गावातीलच माहेर असल्यामुळे सर्वच रीतभात पाहून वागावे लागायचे. तर पतीला त्यांचे बंधू देवा समान तर आई सर्वस्व होती. 

लग्नानंतर पुणे येथे एसएनडीटी कॉलेजमध्ये डीएडला प्रवेश घेतला. पण मी शिक्षिका होणे पसंत केले नाही. त्यामुळे घरातील मोठ्यांचा रोष ओढवून घेतला. मी मात्र ‘आई’ होणार म्हणून खुशीत होते. गरिबी, सोने नसणे हे माझ्या सुखाच्या आड कधीच आले नाही. पुत्ररत्न झाले. बारसे नाही की बाकीचे संस्कार नाही, कारण परिस्थिती! शिवाजीराव पाटील व लीलाबाई पाटील यांनीच नाव ठेवले ‘अजिंक्‍य’ व ‘अजिंक्‍य हो’ असा आशीर्वाद दिला. पुढे बदली झाली. जिथे जाऊ तेथील वातावरण, निसर्ग मनात साठवत राहिले. बदलते गाव, नवा निसर्ग आणि त्यातूनच सुरू झाले निसर्ग वाचन आणि लिखाण. पतीने ते त्यांच्या सुवाच्च अक्षरांत शब्दबद्ध केले. 

पुढे मुले मोठी झाली. परिस्थिती बदलली. नंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी भ्रमंती केली. देश, विदेशातही गेलो. प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. पतीला असाह्य रोगाने ग्रासले होते. त्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आमचे आनंदी आयुष्य जणू काळवंडले होते. पतीच्या निवृत्तीनंतर आम्ही गावी राहणे पसंत केले. गावच्या कार्यात अगदी हौसेने सहभागी होऊ लागले. त्यामुळे यांना मानसिक समाधान व गावचा विकास एकत्र होऊ लागला. आजाराचे स्वरूप, गांभीर्य माहीतच होते. कोणतीही चिंता लागून राहणार नाही याची काळजी सर्वजण घेत होतो. पाहुण्याचे स्वागत करावे ‘यांनीच’ ! सर्वांना हसवावे ते यांनीच’ ! शब्द कोटी करावी ती ‘यांनीच’! आमचे आनंदी दिवस, हसरे क्षण, मुलांचे कौतुक हे क्षण आमच्या कठीण क्षणांची शिदोरी होती. ते होणार होते ते झालेच. मुलांसाठी, आप्तस्वकीयांसाठी मला सावरणे भाग होतेच आणि म्हणून सुरू झाला ‘सहप्रवास’. यांच्यानंतर मी करायचे काय? म्हणून सुरू झाले ‘सहप्रवासाचे लिखाण’ आणि सुरू केले थोडे समाज कार्य. गरजवंतांना यथाशक्ती मदत, अनाथ मुलांच्या आश्रमाला मदत, आप्तस्वकीयांबरोबर प्रेमाने वागणे, धार्मिक शैक्षणिक कार्यात यथायोग्य मदत केली. ‘यांनी’ माझ्यासाठी राखून ठेवलेले काम म्हणजे शेती. शेती म्हणजे त्यांचे स्वप्न. शेतात डोलणारे पीक म्हणजे त्यांच्यासाठी अनमोल ठेवा. तो मी आणि मुलगा व्यवस्थित सांभाळत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com