पारगाव तर्फे आळे बनविणार ‘मॉडेल’

सौ. लताताई संभाजीशेठ चव्हाण
शुक्रवार, 15 मार्च 2019

स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे.

स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे.

जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे गावच्या सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर लोकनियुक्त सरपंचपदाची जबाबदारी सोपवत सर्वांनुमते बिनविरोध निवड केली. माझे माहेर व सासर हे दोन्हीही आदर्शवत आहेत. त्यामुळे राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. माझे माहेर पारनेर (जि. नगर) तालुक्‍यातील दरोडी. माझे वडील कारभारी बाबूराव पावडे हे शेतकरी, तर आई झुंबरबाई गृहिणी आहे. आम्ही सात भावंडे. त्यापैकी पाच बहिणी आणि दोन भाऊ, तसेच घरची परिस्थिती तशी गरिबीची होती. माझा शिक्षणानंतर वयाच्या १८ व्या वर्षी पारगाव तर्फे आळे येथील संभाजीशेठ शिवाजीराव चव्हाण यांच्याशी विवाह झाला. माझे सासरे शिवाजीराव नानाजी चव्हाण यांनीही यापूर्वी गावच्या सरपंचपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली असून, समाजकारणाला प्राधान्य देत ग्रामविकासात अग्रेसर राहिले आहेत. एक दीर व एक नणंद, अशा सुशिक्षित व सुसंस्कारित भरल्या परिवारात आल्यावर आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकले. आम्हाला दोन मुले व एक मुलगी आहे. एक मुलगा वैभव हा कृषी पदवीधर व एम.बी.ए. असून, नोकरी न करता ‘ॲग्रो प्लस सिडलिंग’ नावाने नर्सरीचा व्यवसाय करतो. दुसरा मुलगा जयदेव याचे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट (ABM) शिक्षण पूर्ण झाले असून, तो श्री भैरवनाथ कृषी सेवा केंद्र हा व्यवसाय पाहत आहे. तसेच, दोन पुतणे विजय आणि विशाल हे शिक्षण पूर्ण करून व्यवसाय करीत आहेत. कुटुंबातील जबाबदारी माझी जाऊबाई व मी एकोप्याने सांभाळत आहोत.

चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न
आमच्या एकत्र कुटुंबानेही समर्थ साथ दिल्याने गावातील ज्येष्ठ व वडीलधाऱ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. ग्रामविकासाच्या कामात उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचाही मोलाचा वाटा आहे. तसेच, विकासकामे दर्जेदार व्हावीत, यासाठी आमचा सर्वांचाच प्रयत्न असतो. विविध विकासकामांच्या माध्यमातून गावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मनापासून प्रयत्नशील आहे.

त्यामुळे आतापर्यंत अनेक विकासकामे मार्गी लावण्यात यश आले आहे. यासाठी माझ्या सर्व कुटुंबाची समर्थ साथ ही माझ्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. आमच्या कुटुंबाचेही मला नेहमी मार्गदर्शन लाभते. कोणतीही स्वार्थभावना नसल्याने ग्रामस्थांकडून नेहमीच चांगले सहकार्य मिळते. 

ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदराव पवारसाहेब यांना मी राजकीय जीवनातील आदर्श मानते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकासकामे प्राधान्याने मार्गी लागल्याने ग्रामविकासाला मोठी चालना मिळाली आहे. ग्रामविकासाच्या कामांमध्ये गावठाण परिसरात चोवीस तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले आहे. प्लॅस्टिक व कचरामुक्त गाव करताना नऊ- दहा सिमेंटच्या कचराकुंड्या घेतल्या.

त्यामुळे ग्रामस्वच्छतेचा हेतू काही प्रमाणात साध्य झाला. गावात पाच हायमॅक्‍स दिवे, तसेच ठिकठिकाणी अनेक एलईडी दिवे बसविल्याने गाव अंधारमुक्त झाले आहे. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून नालाखोलीकरण झाल्याने पाणीपुरवठा व शेतीसाठी फायदा झाला आहे.

गावाचा ‘सकाळ ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पात समावेश असून, गावाला मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेचेही पाठबळ आहे. इंदिरानगर वस्तीत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण केले आहे. श्री भैरवनाथ मंदिराजवळ प्रशस्त सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे. गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारी ग्रामपंचायतीची सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची ग्रामसचिवालयाची सर्व सोयीसुविधांयुक्त ‘ग्रामवैभव’ ही प्रशस्त इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. गावठाण परिसरात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.

ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेस डिजिटल शाळा व बोलक्‍या भिंती प्रकल्पासाठी तसेच नेहेरमळा शाळेस शौचालय दुरुस्तीसाठी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच, अंगणवाड्यांना खेळाचे साहित्य व कुकर दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Latatai Chavan on the occasion of womens day