आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका

Mangala-Hinge
Mangala-Hinge

अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील मंगला बाळासाहेब हिंगे यांचा जन्म तालुक्‍यातील घोडेगाव येथे ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकाच्या कुटुंबात झाला. वडील जयसिंग श्रीपती काळे यांना चार मुली असल्याने मंगला यांचा विवाह अकरावीत असतानाच शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब नानाभाऊ हिंगे यांच्या बरोबर झाला. अर्धवट राहिलेले शिक्षण पती व सासूबाई ताराबाई हिंगे यांच्या प्रोत्साहनामुळे पूर्ण करण्याची त्यांना संधी मिळाली. कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत समाजशास्त्र विषयात एमएची पदवी त्यांनी संपादन केली. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याचा प्रत्यय त्यांच्या कुटुंबात येत असून मंगला हिंगे यांची तीनही मुले उच्चशिक्षित बनली आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मंगला हिंगे शिक्षण क्षेत्रातील आवड व कुटुंबाला हातभार लागावा म्हणून १९९६ पासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करू लागल्या. २००६ मध्ये त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदावर बढती मिळाली. त्या सध्या तालुक्‍याच्या पूर्व भागातील पारगाव बीट अंतर्गत येणाऱ्या २९ अंगणवाड्यांवर पर्यवेक्षिका म्हणून काम पाहत आहे. या अंगणवाड्यांपैकी १० अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे, तर २५ अंगणवाड्या आदर्श अंगणवाड्यांमध्ये गणल्या जात आहे. 

त्यांनी अंगणवाड्यांमध्ये बालकांची पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. माता व बालकांचे कुपोषण निर्मूलनासाठी त्यांनी गरोदर स्तनदा माता मार्गदर्शन मेळावा, पोषण आहार जनजागृती अंतर्गत विविध पौष्टिक पदार्थांच्या पाक कला व त्यांचे प्रदर्शनाचे आयोजन केले.

अंगणवाडीतील बालकांना सर्व प्रकारच्या भाज्या खावयास मिळाव्यात यासाठी प्रत्येक अंगणवाडी शेजारी परसबागेची निर्मिती करून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली. बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी बीट पातळीवर बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले.

मंगला हिंगे यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेने त्यांचा २०१७-१८ सालासाठी ‘आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार’ देऊन गौरव केला आहे. त्या उच्चशिक्षित असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिले. मोठी मुलगी मोनिका अभिजित मोरे इंजिनिअर झाली आहे. मुलगा मयूरने इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. दुसरी मुलगी माधवी ज्योतिषशास्त्रामध्ये पीएच.डी. करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com