ज्ञानदान अन्‌ सामाजिक बांधिलकी

मनीषा बाळासाहेब कानडे
शुक्रवार, 15 मार्च 2019

शालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे ब्रीद आहे.   यापुढेही विद्यार्थ्याची ज्ञानरूपी फुलबाग फुलवून उत्तम संस्कारांतून आदर्श नागरिक घडविण्याचा मानस आहे.

शालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे ब्रीद आहे.   यापुढेही विद्यार्थ्याची ज्ञानरूपी फुलबाग फुलवून उत्तम संस्कारांतून आदर्श नागरिक घडविण्याचा मानस आहे.

विजयादशमीला शिवजन्मभूमीत मेहेर घराण्यात माझा जन्म झाला. पण गरिबीमुळे बालपण अगदी कष्टमय स्थितीत गेले. सातवीत असतानाच प्राथमिक शिक्षक होण्याचे स्वप्न मी निश्‍चित केले. वेळप्रसंगी आई मंजुळाबाईसह शेतात मोलमजुरी करून ओतूरच्या चैतन्य विद्यालयात दहावीला ८२ टक्के गुण मिळविले. ‘कमवा व शिका’ योजनेत काम करून महर्षी कर्वे यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षणशास्त्र पदविका घेतली. राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या मुहूर्तावर अत्यंत साधेपणाने १९९४ मध्ये मी कळंब येथील बाळासाहेब कानडे यांच्याशी विवाहबद्ध झाले.

टाकेवाडी (ता. आंबेगाव) शाळेतून जुलै १९९५ मध्ये शिक्षकी पेशाचा श्रीगणेशा केला. जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळगाव तर्फे  महाळुंगे, लौकी आणि आता एकलहरे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा व वारसा घेऊन प्रामाणिकपणे सातत्याने विद्यार्थी विकासासाठी धडपड चालू आहे. आजतागायत २४ वर्षांच्या सेवेत, ज्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकविले तेथे विद्यार्थी गुणवत्तेसाठी मायेने बालकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. कधीही कोणताही अट्टहास न करता कामातच राम शोधत आहे. ज्ञानदानाचे काम करतानाच एम. ए. (मराठी) पर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. स्वच्छ, सुंदर, शिस्तप्रिय आणि गुणवत्तापूर्वक विविध उपक्रम राबवून राज्यात आदर्श ठरलेल्या लौकी शाळेत कामाचा ठसा उमटविला. द्विशिक्षकी शाळेचे वरिष्ठ प्राथमिक शाळेत रूपांतर करून अर्ध्यावर शिक्षण सोडणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आदिवासी ठाकर तसेच दगडखाण कामगारांच्या मुलांना शाळेत शिकविले व टिकविले. लौकी शाळेला जिल्हा व राज्यस्तरावरील विविध पुरस्कार मिळाले तर गावास राष्ट्रीय निर्मलग्राम व तंटामुक्तीचा विशेष शांतता पुरस्कारही मिळाला. शालेय सहकारी शिक्षक तसेच ग्रामस्थांची साथ मिळाली. 

प्रशासकीय बदलीने एकलहरे शाळेत दाखल झाले. येथील इमारत जुनी व धोकादायक होती. सहकारी शिक्षक आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचे रूप बदलायला सुरवात केली. सर्व शिक्षा अभियान, एम्पथी फाउंडेशन मुंबईच्या माध्यमातून आरटीई निकषानुसार मॉडेल स्कूल उभारले. राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे यांचे सहकार्य लाभले. शाळेला आयएसओ मानांकनाबरोबरच वेबसाइट निर्मिती, ई-लर्निंगसह शाळा डिजिटल केली. ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ योजनेत शाळेला पंचतारांकित मानांकन तर शाळा सिद्धीत ‘अ’ श्रेणी आहे.  

तनिष्का गटनेत्या तसेच फ्रेंड्‌स ऑफ चिल्ड्रेन्स पुणेद्वारे हुशार व गरजू, उच्च शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला. शालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे ब्रीद आहे. ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानची ‘गुणवत्ता, स्वच्छता, श्रम अन्‌ संस्कारांतून राष्ट्रविकासाकडे’ या ध्येयाने वाटचाल सुरू आहे. 

आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यातील प्रथम महिलाध्यक्षा म्हणून जबाबदारी समर्थपणे पेलली. संघटनात्मक कार्य करताना आपल्या मूळ कार्याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ संचलित शिक्षण मंडळाच्या संचालिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गट आणि भारत ज्ञान विज्ञान समुदायाच्या सदस्या म्हणून कार्यरत आहे. सलाम मुंबई फाउंडेशनच्या ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियानात सक्रिय असून, व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करत आहे. कार्याचा गौरव म्हणून पुणे जिल्हा परिषद, इनस्पिरा रोटरी क्‍लब पुणे, नेहरू युवा केंद्र पुणे, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई, रोटरी क्‍लब मंचर, पंचायत समिती आंबेगाव यांनी गौरविले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लघुपटास जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला. यापुढेही शालेय विद्यार्थ्याची ज्ञानरूपी फुलबाग फुलवून उत्तम संस्कारातून आदर्श नागरिक घडविण्याचा माझा मानस आहे.

Web Title: Inspirational story of Manisha Kanade on the occasion of womens day