वाफगाव ते बहुराष्ट्रीय कंपनी यशस्वी प्रवास

Neha-Naikade
Neha-Naikade

ऑक्‍टोबर २०१६ मध्ये सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. यामध्ये अनेक अनुभवी व तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभले व खऱ्या अर्थाने दूरदृष्टी लाभली. प्राथमिक अवस्थेतील सिसनिक आयटी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असूनसुद्धा बहुराष्ट्रीय कंपनी इतकेच मानांकन व इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे केले.

वाफगाव (ता. खेड) या ऐतिहासिक असलेल्या खेडेगावातील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. वडिलांनी शेतीशी संलग्न असलेला किराणा मालाचे दुकानापासून ते पेट्रोल पंपापर्यंत व्यवसाय केले. त्यामुळे व्यवसायाचे बाळकडू लहान वयापासूनच मिळत गेले व व्यवसायाची आवड मला निर्माण झाली. दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण वाफगावातच झाले. राजगुरुनगरला बारावी पास झाल्यानंतर पदवीच्या पहिल्या वर्षात विद्यापीठाने संगणकशास्त्र हा विषय नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट केला होता. गणित विषयाची आवड होतीच. प्राचार्य जे. डी. टाकळकर सर यांनी संगणकशास्त्र हा विषय घे, असे सूचित केल्याने पदवीच्या शिक्षणामध्ये संगणकशास्त्र विषयाची निवड केली. यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात संगणकाची Entry झाली. पदवी पूर्ण झाल्यानंतर संगणक विषयात करिअर करायचे हा निर्धार केला. नोकरी करायची नाही तर नोकऱ्या तयार करायच्या. या निर्णयाशी मी ठाम होते.

पुण्यातील काही नामवंत संस्थेतून संगणक क्षेत्रातील विविध कोर्सेस शिकून पदविका व पदव्या घेतल्या. पहिल्याच दिलेल्या मुलाखतीत बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली. परंतु मनातील इच्छा काही वेगळीच होती. व्यवसाय स्वतःच्या बळावर व कर्तृत्वावर करायचा. असा निर्धार केला होता. पण कुटुंबाचा विरोध होता. ‘एवढी चांगली नोकरी सोडून व्यवसायात कशाला पडतेस.’ असे त्यांचे म्हणणे होते. पुण्यामध्ये ABC ध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र हा व्यवसाय कर्ज काढून चालू केला. पहिल्या दोन-तीन महिन्यांत खूप चांगल्या पद्‌धतीने सेट झाला. साधारणपणे १२ महिन्यांनंतर असे लक्षात आले की आपण शहरामध्ये काम करतोय या ठिकाणी खूप संस्था आहेत. परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च पद्धतीचे संगणक प्रशिक्षण देऊ शकलो, तर खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना होईल. साधारणपणे २००८ मध्ये राजगुरुनगर येथे एम केसीएलची मान्यता असलेले संगणक प्रशिक्षण केंद्र चालू केले. इंजिनिअरिंग व मेडिकलला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IIT - JEENEET या प्रकारच्या विविध परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू केले.

दरम्यानच्या काळात संगणक प्रशिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाटचाल केली. त्यामध्ये उत्तुंग असे यश संपादन केले. २००८ ते २०१६ या कालावधीमध्ये ‘एमकेसीएल’चे विविध प्रकारचे पुरस्कार व उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण, राज्यस्तरीय उत्कृष्ट महिला उद्योजिकता पुरस्कारही मिळाला. अर्थात यामध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे योगदान मोलाचे आहे. हे सर्व करत असताना एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू करायची असा विचार सतत मनात घोळतच होता. ऑक्‍टोबर २०१६ मध्ये सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. यामध्ये अनेक अनुभवी व तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभले व खऱ्या अर्थाने दूरदृष्टी व vision लाभले. प्राथमिक अवस्थेतील सिसनिक आयटी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असूनसुद्धा बहुराष्ट्रीय कंपनी इतकेच महत्त्वाचे असे मानांकन व इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे केले. तसेच या काळात परदेशातील काही कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. वाफगाव ते बहुराष्ट्रीय कंपनी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, परंतु प्रचंड इच्छाशक्ती व कष्ट करण्याची आवड, माहेर व सासरच्यांनी दिलेली साथ, पती शाम व मुले निमिष, वेदा यांचे योगदान मिळाल्यामुळे यशाच्या शिखरापर्यंत पोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com