नीलमताईंनी जोपासला सावित्रीबाईंचा वसा

Nilamtai-Tambe
Nilamtai-Tambe

कोणत्याही यशस्वी व्यक्तीमागे एक स्त्री असते, हे नीलमताई तांबे यांनी कर्तृत्वाने सिद्ध झाले आहे. त्या आदर्श पत्नी आणि आदर्श माता आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी व कार्यानी प्रेरित होऊन जणू त्यांचा शैक्षणिक वसाच त्यांनी घेतला आहे.

नीलमताई या लहानपणापासून खूप हुशार आणि शिस्तप्रिय होत्या. त्यांचा जन्म १५ जून १९५४ मध्ये राजुरी (ता. जुन्नर) येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण बेल्हे (ता. जुन्नर) येथे झाले. त्यांचे वडील हरिभाऊ यशवंतराव गुंजाळ हे खूप कडक शिस्तीचे होते. नीलमताई यांना शिक्षणाची आवड होती.

मात्र, डी.एड. करण्याची इच्छा असतानादेखील ते त्यांना करता आले नाही. त्यांचे कुटुंब हे खूप सुशिक्षित व प्रगतिशील शेतकऱ्याचे होते. त्यामुळे त्यांनी वडिलांबरोबर जी जमेल ती कामे केली.

नीलमताई यांचा विवाह १६ मे १९७६ रोजी ओतूर (ता. जुन्नर) येथील शिक्षक श्री. विलासराव सावळेराम तांबे यांच्याशी झाला आणि ओतूर येथील जुने घर असलेल्या आमदार मळ्यात त्या राहू लागल्या. सासरे सावळेराम तुकाराम तांबे, दीर विजय सावळेराम तांबे आणि तीन नणंदांची सर्व जबाबदारी सांभाळत त्या चांगल्या प्रकारे संसार करत होत्या. त्यांनी पती विलासराव सावळेराम तांबे यांच्या पुढील कार्यात पूर्णपणे पाठिंबा देण्याचे ठरविले.

नीलमताई यांनी पुढाकार घेऊन ४ सप्टेंबर १९८८ रोजी डिंगोरे या ठिकाणी स्टाइल फॅक्‍टरी सुरू केली. त्याच्या दुसऱ्या वर्षी विलास सरांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांनी ठरवले की, मला शिक्षक नोकरी सोडून एक मोठं शैक्षणिक संकुल तयार करायचं आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या, आदिवासी, भटक्‍या, होतकरू व गरीब मुलांसाठी मला काहीतरी करायचं आहे. नीलमताई यांनी त्यांना पूर्णपणे साथ देण्याचे ठरविले आणि फॅक्‍टरी व शेतीचा मिळणारा पैसा त्यांनी सरांचे स्वप्न असलेली शिक्षण संस्था उभे करण्यासाठी वापरला.

विलास सरांनी सन १९९०- ९१ मध्ये श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून केवळ ९ आदिवासी मुली घेऊन ओतूरमध्ये सावित्रीबाई फुले विद्यालय सुरू केले. त्या वेळी त्यांना विविध आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागले. वसतिगृह सुरू करताना त्यांनी मुलींना प्रथम स्वतःच्या घरात ठेवले. नीलमताईंनी त्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांना आईचे प्रेम दिले. तेव्हापासून नीलमताईंना सर्व जण ‘भाभी’ म्हणू लागले. शिक्षकांचा पगार, मुलींची जबाबदारी यासाठी आर्थिक अडचणी आल्या. प्रसंगी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवले. शेतीमध्ये आले व हळदीचे उत्पादन घेऊन येणाऱ्या पैशामध्ये त्यांनी विलास सरांना खूप मोठ्या प्रकारे साथ दिली. पांगरीमाथा, आंबेगव्हाण, कुसूर या दुर्गम भागात शाळा सुरू करताना येणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देताना त्या खंबीरपणे विलास सरांबरोबर होत्या. भाभींनी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाल्यापासून अविरतपणे विलासराव सरांना साथ दिली. १३ फेब्रुवारी २०१२ रोजी विलासरावांचे देहान्त झाल्यानंतर त्यांनी न डगमगता दुःख बाजूला ठेवले. त्या आपल्या मुलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. 

अजिबात खचून न जाता त्या संस्थेच्या रोपट्याच्या झालेल्या वटवृक्षाकडे सतत लक्ष देत असतात. नीलमताई यांना ३ जानेवारी २०१९ मध्ये कात्रज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. डुंबरवाडी या ठिकाणी जे शैक्षणिक संकुल आहे, ते म्हणजे विलास सर आणि भाभी यांची स्वप्नपूर्तीच आहे. ओतूर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या त्या सहसचिव म्हणूनही काम त्या पाहत आहेत. 

नीलमताई व विलासरांनी आपली तीनही मुले विशाल, वैभव आणि वृषाली यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले आणि मुलांवर चांगले संस्कार केले. नीलमताई आपल्या मुलांची व कुटुंबाची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत होत्या. त्यांचे ज्येष्ठ पुत्र विशाल हे पुणे (धनकवडी) या ठिकाणी नगरसेवक आहे.

तसेच, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूरचे अध्यक्षपदी कार्यरत आहे. वैभव हे गजानन महाराज शिक्षण संस्थेच्या सचिवपदी कार्यरत असून, वटवृक्षाप्रमाणे विस्तारत असलेली संस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. कन्या वृषाली ही वैद्यकीय क्षेत्रात इंग्लंड येथे आहे. 

भाभींना आपल्या वडिलांकडून राजकारण, उत्तम शेतीचे कौशल्य, एकत्रित कुटुंब पद्धतीचा वारसा मिळाला. त्याच जोरावर त्यांनी आपल्या सासरी शेती उत्तम प्रकारे करून अहोरात्र कष्ट करून भरीव पिकेही घेतली. त्यामुळे एक उत्तम शेतकरी म्हणून स्व. सोपानराव शेरकर यांनी त्यांना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका म्हणून संधी दिली. सन २००४- ०५ मध्ये त्या विघ्नहर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी संचालक पदावर नियुक्ती झाली, ती आजपर्यंत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com