किसी का सहारा बनो!

Niyatitai-Shinde
Niyatitai-Shinde

लोकांसाठी सरकारी योजना व त्याचा लाभ मिळावा, म्हणून मी सतत झटते. आता माझी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या माध्यमातून परित्यक्‍त्या आणि बेरोजगार महिलांना रोजगार देण्यासाठी हातगाडी, भाजीविक्रीचा व्यवसायास प्रोत्साहन दिले.

अगोदर पाच मुली जन्मल्याने माझा जन्म झाल्यावर तीन दिवसांत आईने फेकून दिले. मात्र चुलतीने माझा सांभाळ केला. १९९८ ला ओरिसामधून भावाबरोबर आळंदीत आले. भावाने चार लाख रुपये घेऊन माझे लग्न लावले. तीथेही  माझे नशीब फुटले. तरीही न खचता मी स्वतःच्या पायावर उभे राहून शिलाई मशीन ते जमिनीला कंपाउंड करायचे काम केले. आणि बघता बघता घर, गाडी, सत्तर महिला आणि चाळीस तृतियपंथी असे माझे कुटूंब तयार झाले. ओरिसासारख्या राज्यातून आलेल्या एका निराधार महिलेला अवघ्या वीस वर्षांत माउलींच्या नगरीत सर्व काही मिळाले याचेच समाधान आता मला आहे.

‘तुम बेसहारा हो तो, किसी का सहारा बनो, तुमको अपने आपही, सहारा मिल जायेगा,’
या मन्ना डे यांच्या गीताप्रमाणेच माझे आयुष्य. बारावीपर्यंत शिक्षण झाले. लग्न झाले पण पतीच्या मिळकतीतून कुटुंबाची गरज भागत नव्हती म्हणून आळंदीत शिवणकाम केले. एक स्त्री म्हणून लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहत. यामुळे कर्जाऊ पैसे घेऊन स्वतःच्या चार शिलाई मशिन घेतल्या. माझ्यासारख्याच महिलांना मशिन दिल्या. त्यांच्याकडून कपडे शिऊन घेऊ लागले. सुरवातीला दहा वर्षे मी सायकल चालवून व्यवसाय केला.

विश्रांतवाडीत बिगबझारला साबणाचे स्टॉलही लावले. कमाई कमी झाल्याने परिसरात जागांना तार कंपाउंडचे काम करू लागले. यामध्ये माझ्या महिलाही सोबत येत. मेहनत आणि तंटा होता. मात्र पैसे चांगले मिळाले. आलेल्या पैशातून अर्धा गुंठा जागेत मी स्वतःचे घर बांधले. यामधे परित्यक्‍त्या निराधार महिला आणि तृतियपंथींना आसरा दिला. त्यांच्या हातांना काम मिळावे म्हणून मंगल कार्यालय चालविते. मंगल कार्यालयामुळे पैसेही मिळू लागले आणि जेवणाची समस्याही मिटली.

आळंदीत अठरा वर्षांचा तृतीयपंथी रस्त्यावर चक्कर येऊन पडला. त्याला कोणीच उचलले नाही. मी आधार देत घरी नेले आणि त्याला आसरा दिला. एकेक करून चाळीस तृतीयपंथी माझ्या घरात राहत आहे. शेजारीपाजारी सुरवातीला वेगळ्या नजरेने पाहत. दारू प्यायले की माझ्याकडे तक्रार करत. मात्र आता अनेकांची व्यसन सोडण्याचे काम केले. यातील लोक भीक मागण्याचा व्यवसाय सोडून माझ्या कामात मदत करत आहेत. पैसा आणि प्रतिष्ठा देण्याचे काम माझ्याकडून झाले याचेच मला समाधान अधिक.

वर्षाला चार विवाह माेफत लावण्याचा संकल्प 
पोलिस ठाण्यात येणारी कौटुंबिक तंटे मिटवण्याचे काम केले. क्राईम झाल्यास महिलांबाबतची मदतीची कामे करण्यासाठी मी  आणि माझ्या महिला कार्यकर्त्या तत्पर असतो. परिसरातील पंधरा पोलिस ठाण्यात आमचा संपर्क आहे. आळंदीत झोपडपट्टीतील चार मुलींची मोफत लग्ने लावून संसार उभा केला. वर्षाला चार मोफत लग्ने लावण्याचा माझा संकल्प आहे.

याचबरोबर इंद्रायणी घाटावर अनेकजण वृद्धांना सोडून जातात. त्यांना मी आधार देत त्यांच्या घरी पुन्हा पोचविते. एखाद्या कुटुंबाने नकार दिल्यास पोलिसांच्या साहाय्याने वृद्धाश्रमात पोचविते. गरीब महिलांना साडी वाटप आणि इतर सामाजिक उपक्रमात अन्नदानासाठी मदत करते.

लोकांसाठी सरकारी योजना आणि त्याचा लाभ मिळावा, म्हणून मी सतत झटते. आता माझी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली. पक्षाच्या माध्यमातून परित्यक्‍त्या आणि बेरोजगार महिलांना रोजगार देण्यासाठी हातगाडी, भाजीविक्रीचा व्यवसायास प्रोत्साहन दिले. तुमची नियत जर साफ असेल तर लोक तुम्हाला ओळखू लागतात.

मला जे दुख आले ते इतरांना येऊ नये, हीच माझी भावना सतत असते. याच भावनेतून मी काम करते. कधी वाईटपणाही येतो. पण मदतीसाठीही लोक येतात. गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत मी केलेली मेहनत आणि लोकांशी असलेल्या संपर्काच्या बळावर आज माझ्याकडे लोक विविध कामे घेऊन येतात. हजारो किलोमीटरहून आलेल्या माझ्यासारख्या निराधार महिलेकडे लोक आंबट शौकीन नजरेने सुरवातीला पाहत होते. कधी नैराश्‍य आले. मात्र खचून न जाता मी कष्ट केले. नियतीशी सामना करत जगले. आता संपर्काच्या बळावर विविध कार्यक्रमाला आवर्जून बोलवितात. कुणी ‘भाभी’ कुणी ‘ताई’ म्हणतात. पण त्यांच्यातील आपुलकी हीच माझ्या कामाची पावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com