रुग्णांचा आनंद हाच खरा पुरस्कार

डॉ. पल्लवी सदानंद राऊत
गुरुवार, 14 मार्च 2019

शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार.

शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये डॉ. सदानंद राऊत यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण चालू असल्याने सासरी उंब्रज (ता. जुन्नर) येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. धरणग्रस्त व छोटे खेडेगाव असल्याने कुठल्याही सुविधा नसताना वैद्यकीय सेवा देताना अनेक अडचणीवर मात केली. घरोघरी जाऊन वैद्यकीय सेवा पुरविली. महिलांच्या उन्नतीसाठी प्रगती महिला संस्थेची स्थापना केली. उंब्रजचे उपसरपंच म्हणूनही काम पाहिले. 

गेली २५ वर्ष नारायणगाव येथे पती डॉ. सदानंद राऊत यांच्या बरोबरीने विघ्नहर नर्सिंग होमच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत आहोत. सुरवातीचा काही काळ नारायणगाव ते उंब्रज एसटीने प्रवास करून उंब्रज व परिसरातील रुग्णांना सेवा दिली. हॉस्पिटलचा व्याप वाढल्यानंतर पूर्ण वेळ नारायणगाव येथे वैद्यकीय सेवा देत आहे. विघ्नहर मेडिकल फाउंडेशन संस्थेची सचिव म्हणून काम करत आहे. ग्रामीण व आदिवासी भागात अनेक मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आम्ही राबविलेला कुपोषित बालक प्रकल्प महाराष्ट्रात आदर्श ठरला. दोन महिने कुपोषित बालक व माता हॉस्पिटलमध्ये एकत्र कुटुंबासारखे राहिलो.

ग्रामीण भागातील गरज ओळखून अतिदक्षता विभागाची सुरवात केली. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण केईएम रुग्णालयात वर्षभर घेतले. अनेक गंभीर रुग्णांचे जीव वाचविण्यात यश आले. हृदयविकार, विषबाधा, सर्पदंश अतिगंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार केले. आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम राबवीत असल्यामुळे दूरदर्शनवर मुलाखत देण्याची संधी मिळाली. 

सर्पदंशावरील केलेल्या कामाच्या अनुभवामुळे ऑस्ट्रेलिया येथील आंतरराष्ट्रीय परिषद व आंतरराष्ट्रीय विषबाधा तज्ज्ञांच्या ऑक्‍सफर्ड लंडन, युके येथे झालेल्या परिषदेत व्याख्यान देण्याची संधी मिळाली.
पती डॉ. सदानंद राऊत यांना सामाजिक सेवेची आवड असल्याने राजकीय, वैद्यकीय व शास्त्रज्ञ यांची घरी नेहमी ये-जा असते. डॉ. मेहरू मेहता, डॉ. जाल मेहता, डॉ. सायरस पूनावाला, प्रा. गोविंद स्वरूप, डॉ. फारुख वाडिया, डॉ. डेव्हिड वॉरेल यांच्याशी संवादाची संधी व मार्गदर्शन मिळाले. जिजामाता ग्रामीण महिला पतसंस्थेच्या संचालक, सल्लागार म्हणून अनेक वर्ष काम करीत आहे. लायन्स क्‍लब ऑफ शिवनेरी जुन्नरच्या अध्यक्ष म्हणून महिला व मुलींसाठी मधुबनी पेंटिंग वर्कशॉप, संगणक प्रशिक्षण आदी उपक्रम राबविले. 

नारायणगाव ग्रामपंचायतीने आदिशक्ती पुरस्कार, जुन्नर येथील दुर्गामाता मंडळाने दुर्गामाता पुरस्काराने सन्मानित केले. आजही आम्ही सासू-सासऱ्यांसह एकत्र राहतो. मुलगा संदेश नुकताच एमबीबीएस झाला असून पुढील शिक्षण घेत आहे. सदैव हसतमुख, प्रसन्न, प्रेमळ, सहृदय व अहोरात्र रुग्णसेवेसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे पती डॉ. सदानंद राऊत. त्यांनी मला सतत प्रेरणा प्रोत्साहन दिले. अगदी मृत्यूशी झुंज देत शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांना जीवदान देण्याचे काम करण्यात आम्ही यशस्वी झालो. शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णांना रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. डॉक्‍टरकीचे शिक्षण घेणारा मुलगा गौरव अचानक आम्हाला सोडून गेला. या दुःखातून सावरण्यासाठी अनेकांनी खंबीर आधार दिला. त्यामुळे रुग्णसेवा अव्याहतपणे सुरू ठेवत आहोत. अनेक पुरस्कार मिळाले तरी अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Pallavi Raut on the occasion of womens day