श्रमसंस्कृतीतून साधले कृतार्थ जीवन

Parvatibai-Patil
Parvatibai-Patil

परमेश्वराने माझी ओटी नेहमीच सुखा-समाधानाने भरलेली ठेवली. घराचं गोकूळ आहे. आज पतीचं वय ८५ व माझं ८० आहे. आजही आम्ही दोघं निरोगी आहोत. कारण आम्ही शाकाहाराचा अंगीकार केला आणि श्रमाला प्राधान्य दिलं.

आंबेगाव तालुक्‍यातील रांजणी गावातील प्रगतशील शेतकरी उद्धव अप्पाजी वाघ यांची मी कन्या. माहेरी सर्वजण मला झुंबराबाई नावाने ओळखतात. ज्याकाळी शिक्षणातील मुलींचं प्रमाण कमी असायचं, त्यावेळी मी सातवी पास झाले. तालुक्‍याच्या पूर्व भागातील धामणी परिसरात नावलौकिक असलेले प्रसिद्ध गाडामालक स्वर्गीय गेणभाऊ महादू जाधव पाटील यांचे चिरंजीव म्हातारबा जाधव पाटील यांच्याशी १९५४ मध्ये माझा विवाह झाला. 

गावातील प्रतिष्ठित घर, गाव कारभारात सक्रिय व शेती, बैलगाडा यांची आवड असणारं कुटुंब. या कुटुंबाचा व्याप खूप मोठा होता, त्यामुळे सुरवातीच्या काही महिन्यांतच मला माझ्यावर येणाऱ्या पुढील सर्व जबाबदारीची पूर्ण कल्पना आली. कुटुंबात मी सुशिक्षित होते, त्यामुळे घरात थोरा-मोठ्यांकडून साहजिकच अधिक अपेक्षा राहिल्या. मला माझे बंधू तुकाराम वाघ यांच्याप्रमाणे शिक्षक होता आलं नाही; पण मला माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्याकरिता शिक्षण आग्रही करता आलं.

माजी आमदार दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या कुटुंबांचे आमच्या घराशी जिव्हाळ्याचे संबंध होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही ती परंपरा कायम राखली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या माध्यमातून तिसऱ्या पिढीने आजही ती परंपरा आजतागायत कायम ठेवली आहे. त्यामुळे आमचं घराणं गावाबरोबर तालुक्‍यातील मातब्बर कुटुंब असल्याने अनेक कार्यकर्ते, पुढारी मंडळी यांचा राबता नेहमी असायचा. 

शेतीबरोबरच माझ्या जाऊबाई गजराबाई, सुमन, मंदा, शकुंतला व मंजुळाबाई यांचीही एकत्र कुटुंब असल्यामुळे या साऱ्या बाबींमध्ये मोलाची साथ लाभली. थोरला मुलगा रामदास पदवीपर्यंत शिक्षण घेऊन शरद सहकारी बॅंकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असतानाच त्याने आमच्या कुटुंबाच्या सामाजिक कामांचा वारसा जोपासण्याचं काम सुरू ठेवलं आहे.

धाकटा मुलगा डॉ. महेश कात्रज दूध संघाच्या माध्यमातून जनावरांची सेवा करत आहे, तर मधला भिकाजी पाटील उत्तम प्रकारे आदर्श शेती करत आहे. माझ्या सर्व नातवंडांनीही उच्चशिक्षण घेतलं आहे. 

माझे यजमान म्हातारबा जाधव पाटील ऊर्फ दादा हे अतिशय स्पष्टवक्ते व तितकेच संवेदनशील निर्व्यसनी व माळकरी. त्यांनी गावात अनेक संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम केलं. उल्लेखनीय म्हणजे सतत दीर्घकाळ ३३ वर्षं त्यांनी धामणी सोसायटीवर बिनविरोध अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यांच्या समाजकार्याची तडफ, तसेच वळसे पाटील कुटुंबाचा त्यांच्यावरील दांडगा विश्वास व निष्ठेचा सन्मान करत माजी आमदार दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील (दादा) यांनी तालुकास्तरावरील खरेदी- विक्री संघावर अध्यक्षपद भूषविण्याची दोनदा संधी दिली. वयाच्या ८५ व्या वर्षीसुद्धा गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यालयाचे अनेक वर्षांपासून स्कूल कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहत आपलं शैक्षणिक योगदान देत आहेत. माझी तीनही मुलं, सुना कुंदा, भारती व संगीता; नातवंडं व नातसून प्राध्यापिका शीतल अजिंक्‍य जाधव पाटील हे सर्वजण आम्हा उभयतांची काळजी घेत आहेत. काही वर्षांपूर्वी माझे पती म्हातारबा जाधव पाटील ऊर्फ दादा हे अतिशय दुर्धर आजाराने पीडित होते. गावचं कुलदैवत श्रीक्षेत्र म्हाळसाकांत खंडोबाचा आशीर्वाद, स्वतःची प्रचंड इच्छाशक्ती व परिवारातील सदस्यांचा स्नेह आणि तालुक्‍याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांची वैद्यकीय उपचारात झालेली मोलाची मदत यामुळे ते आज त्या आजारापासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com