चित्रकलेतून जगण्याची दिशा

Prajakta-Hiramani
Prajakta-Hiramani

रेखाटलेल्या विविध कलाकृतींना मुक्त व्यासपीठ मिळावे, ही माझ्या पतींची मनोकामना पूर्ण करण्याची संधी १४ जानेवारी २०१८ ला मिळाली. ज्या नगरीत शिक्षण घेतले , कलेचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला, तेथेच ३५ वर्षांनी कला संक्रमण नावाने भव्य प्रदर्शन पार पडले.

वाचनातून समृद्ध विचारांची निर्मिती होते, तर विचारांना नि:शब्द रेखाटण्याचे कौशल्य कलेच्या साधनेत असते. उच्च शिक्षण घेऊन नोकरी करणे शक्‍य नव्हते, तर स्वतःमध्ये दडलेला चित्रकार स्वस्थ बसू देत नव्हता. यामुळे चित्रकलेच्या छंदालाच जीवन मानून जीवन जगण्याची कला म्हणून स्वीकारले. पती प्रल्हादजी हिरामणी यांची प्रेरणा व प्रत्येक टप्प्यावर माझ्यातील कलागुण विकसित करण्यासाठी त्यांनी माझे केलेले कौतुक व प्रशंसा यामुळे आज कलेतील रसस्वाद माझ्या कौटुंबिक व सामाजिक जीवनात आनंद निर्माण करीत आहे, यात शंका नाही.

शालेय शिक्षण सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झाले. स्वातंत्र्य संग्रामात, तसेच महाराष्ट्राच्या जडणघडणीत सोनेरी पान अशी ओळख असणाऱ्या कराड येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. घरातील वातावरण निकोप आणि विचारांच्या कक्षा रुंदावण्यासाठी पोषक होते. आई-वडिलांच्या संस्कारांमुळे लहानपणी सकारात्मक विचारांचा पाया रुजविला गेला.

लहानपणापासूनच अवांतर वाचनाची आवड असल्यामुळे घरातूनच साहित्य व कलेच्या क्षेत्रातील वाचन करण्यास प्रोत्साहन मिळाले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील निट्टूर येथील प्रल्हाद हिरामणी यांच्याशी विवाह झाला. कला जोपासण्यासाठी माझ्या कलेच्या साधनेत सर्वांत खंबीर साथ व प्रोत्साहन मला पतीकडून मिळाली. माझे पती प्रल्हाद हिरामणी हे महसूल विभागात उच्चपदस्थ अधिकारी असल्याने त्यांच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्यांमुळे नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. 

पाटण येथे वास्तव्यास असताना चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. आवड असलेल्या विषयाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्याने या छंदाकडे जीवन जगण्याची प्रेरणा देणारी कला म्हणून पाहायला लागले. हळूहळू स्केचिंग, ड्रॉइंग करीत २०१३ मध्ये मॉडर्न आर्ट म्हणजेच ॲबस्ट्रॅक्‍ट पेंटिंग करू लागले. 

या घटकातून स्वतःला व्यक्त करणे चांगले वाटू लागले. मी करीत असलेले ॲबस्ट्रॅक्‍ट पेंटिंग हे उत्स्फूर्तपणे केलेली कलाकृती आहे. त्याआधी मी कधीही रेखांकन करीत नव्हते. क्षणात मनामध्ये निर्माण झालेल्या भावना आणि कल्पनांचा सुरेख संगमातून एक कलाकृती आपसूक रेखाटली जाते. गेल्या दोन वर्षांपासून केलेली पेंटिंग ही त्या क्षणातील भावना अंतर्मनातून निर्माण झालेली असून, ही पेंटिंग माझ्या विचारांचेच प्रतिबिंब आहेत.  

सन २०१७ पासून मी डुडलिंग करायला शिकले. पेन व पेपरच्या साह्याने कृष्णधवल फुलांचे डिझाईन करू लागले. डुडलिंग हे माझ्यासाठी ध्यानधारणे प्रमाणे आहे.  सध्या डुडलिंग सोबतच ‘मंडला’ करू लागले आहे.  मन शांत ठेवून स्वतःतील सृजनशीलतेला उभारी देण्याचे काम निश्‍चितच कलेच्या माध्यमातून होत आहे. 

गेल्या काही वर्षांपासून कलेची साधना करीत असताना रेखाटलेल्या विविध कलाकृतींना मुक्त व्यासपीठ मिळावे, ही माझ्या पतींची असणारी मनोकामना पूर्ण करण्याची संधी १४ जानेवारी २०१८ ला मिळाली. ज्या कराड नगरीत शिक्षण घेतले , कलेचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला त्याच नगरीत ३५ वर्षांनी दोन दिवसांचे कला संक्रमण नावाने भव्य प्रदर्शन पार पडले. सातारा, कराड, पुणे, पाटण येथून आलेल्या कलारसिकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त दाद दिली. या प्रेमामुळेच भविष्यातही अधिकाधिक उत्तम व दर्जेदार चित्रे रेखाटण्याचे मनोधैर्य  उंचावले म्हणूनच चित्रकलेच्या माध्यमातून मानसिक समाधानाची परिपूर्ती कदाचित नोकरीतून मिळाली नसती, याची प्रचिती आली. जीवनात कोणताही प्रवास सोपा नसतो, तर खडतर वाटेवरून संघर्ष करत, न थकता व निराश न होता त्याच मार्गावर प्रवास करीत राहिलात तर  एक दिवस सर्व अडथळ्यांवर मात करता येते.

स्वतःकडे उपलब्ध असणाऱ्या परिस्थितीचे आभार माना, ती कितीही लहान असली तरी ! स्वतःबद्दल अभिमान बाळगा, गर्व करण्यासाठी नाही तर दुसऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी, असे माझे प्रामाणिक मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com