प्रवास एका स्वप्नाचा

डॉ. रेश्‍मा संतोष शिंदे-बचुटे
गुरुवार, 14 मार्च 2019

सन २०१२-१३ चा गुणवंत अधिकारी/कर्मचारी हा पुरस्कार माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ. संतोष शिंदे यांची शांत, संयमी, प्रेमळ साथ; आई-वडिलांचा, सासूबाईंचा आशीर्वादाचा हात, हे माझ्या कारकिर्दीचे खंबीर आधारस्तंभ आहेत.

सन २०१२-१३ चा गुणवंत अधिकारी/कर्मचारी हा पुरस्कार माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ. संतोष शिंदे यांची शांत, संयमी, प्रेमळ साथ; आई-वडिलांचा, सासूबाईंचा आशीर्वादाचा हात, हे माझ्या कारकिर्दीचे खंबीर आधारस्तंभ आहेत.

कमी दिवसांतला व कमी वजनाचा जन्म, जन्मतः कावीळ, मग बालदमा...यामुळे श्वासागणिक संघर्ष करीत, सतत डॉक्‍टरांकडे धावपळ करीत वाढले, अगदी अजाणत्या वयातच डॉक्‍टर होण्याचे स्वप्न मनी रुजले. मुलगी असूनही वडील रामचंद्र बचुटे व आई शीतल बचुटे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे सोलापूरमधील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सन २००३ मध्ये एमबीबीएसची पदवी घेऊन मी डॉक्‍टर झाले.

मे २००४ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा (ता. इंदापूर) येथून वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. जाणवले की, हे पद अतिशय जबाबदारीचे व तितकेच आव्हानात्मक आहे. सभोवताली आरोग्याचे असंख्य प्रश्न, तोकडी साधने, लोकांची अनास्था व उदासीन वृत्ती यांना तोंड देत जिद्दीने प्रामाणिकपणे सेवेला सुरवात केली. समाजातल्या सर्व स्तरातल्या घटकांना प्रतिबंधात्मक आणि प्राथमिक स्वरूपाची उपचारात्मक आरोग्य सेवा अत्यल्प दरात उपलब्ध व्हावी, हा शासनाचा उद्देश मनात रुजविला. सर्दी खोकला ते हृदयरोग, सर्पदंश ते जोखमीची प्रसूती, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आरोग्य शिबिर, शस्त्रक्रिया, मेडिकोलीगल केसेस इ. शिकत अनुभवत माझ्यातील सेवाभावी डॉक्‍टर घडली.

सन २००६ मध्ये विवाहानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी (ता. आंबेगाव) येथे पदभार स्वीकारला. सन २००९ मध्ये समावेशाने सेवा नियमित होऊन रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम केळशी (ता. दापोली, जि. रत्नागिरी) आरोग्य केंद्रात सेवा बजावली. तो काळ खरोखर कसोटीचा होता. ११ महिन्यांचे बाळ बरोबर होते. कुठलीही खासगी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने तिथे माझ्यातल्या डॉक्‍टरचा कस लागला. अनुभवाची सर्वांगीण शिदोरी तिथून घेऊन पुन्हा धामणी येथे रुजू झाले. येथे १० वर्षे अखंड आरोग्यसेवा देत आहे.

धामणी हे गाव दुर्गम, डोंगरी, खेड, शिरूर, आंबेगाव या तीन तालुक्‍यांच्या सीमारेषेवरच. वाहतुकीच्या फारशा सोयी नसणार व पाण्याचे दुर्भिक्ष्य असणार, गरीब व कष्टकरी गाव म्हणूनच माझ्या कर्तृत्वाला नवे आकाश येथे लाभले.

माता व बालआरोग्य क्षेत्रात भरीव काम करता आले. किशोरवयीन मुलींमधला रक्तक्षय व स्त्रियांची कमी वयात होणारी लग्न, कमी अंतराने वारंवार येणारी बाळंतपणे त्यामुळे आरोग्याचा डोलारा पूर्णपणे ढासळलेली स्त्री, अशक्त बालके हे सर्व पाहून अस्वस्थ झाले. हे सर्व टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, लोहयुक्त गोळ्यांचा उपचार, नऊ महिने गरोदरपणातील तपासण्या व उपचार वेळेवर देऊन आरोग्य केंद्रातील प्रसूती वाढवल्या. बालकांचे लसीकरण पोषण, ऊसतोडणी मजुरांचे आरोग्याकडे लक्ष दिले. बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या मधुमेह, रक्तदाब, कर्करोग या सेवांच्या कक्षा वाढविल्या. आरोग्यशिक्षण व जनजागृती केली. चांगली डॉक्‍टर म्हणून लोकांचा विश्वास संपादन केला. 

प्रामाणिक सेवेमुळे सन २००९ मध्ये मला सेवा अंतर्गत भूलतज्ज्ञ होण्याची संधी मिळाली. पण, त्याक्षणी माझ्यातल्या आईने माझ्यातल्या डॉक्‍टरवर मात केली. कुटुंबाला प्राधान्यक्रम देत ती संधी मी सोडली. शासकीय सेवा सुरू ठेवली. सेवेचा बहुमान म्हणून सन २०१२- १३ चा गुणवंत अधिकारी/ कर्मचारी हा पुरस्कार माझ्या आरोग्य केंद्राला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ. संतोष शिंदे यांची शांत, संयमी, प्रेमळ साथ; आई-वडिलांचा सासूबाईंचा आशीर्वादाचा हात, हे माझ्या कारकिर्दीचे खंबीर आधारस्तंभ आहेत. माझ्या अर्णवच्या चेहऱ्यावरचे खळाळते निरागस हास्य हा माझ्या ऊर्जेचा अखंड स्रोत आहे.

आपण राहत असलेल्या समाजाचे काही अंशी ऋण फेडण्याची जनसेवेची संधी मला शासकीय आरोग्य सेवेमुळे मिळाली. म्हणून या सेवेचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नेहमी केला. पैसा एक वेळ कमी कमावला असेन, पण चांगली डॉक्‍टर म्हणून जो विश्वास, आदर लोकांनी माझ्यावर दाखवला, त्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. या सुखद व समाधानी कारकीर्दीचा मला सार्थ अभिमान आहे. डॉक्‍टर होण्याच्या स्वप्नपूर्तीचा हृदयस्थ आनंदही आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Reshma Shinde Bachute on the occasion of womens day