कुटुंबाच्या पाठिंब्याने दमदार वाटचाल...

प्रा. शीला पांडुरंग गायकवाड
गुरुवार, 14 मार्च 2019

आयुष्याच्या जडणघडणीत यजमान प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, माझी दोन्ही मुले व दोन्हीही कुटुंबांतील सर्वच लोकांचा पाठिंबा मिळाल्याने आयुष्याची दमदार वाटचाल करू शकले. शिक्षण क्षेत्रात काम करीत असल्याने देश-परदेशात जाण्याची संधी मिळाली.

आयुष्याच्या जडणघडणीत यजमान प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, माझी दोन्ही मुले व दोन्हीही कुटुंबांतील सर्वच लोकांचा पाठिंबा मिळाल्याने आयुष्याची दमदार वाटचाल करू शकले. शिक्षण क्षेत्रात काम करीत असल्याने देश-परदेशात जाण्याची संधी मिळाली.

इयत्ता तिसरीत असताना माझ्या वडिलांचे निधन झाले आणि तिथूनच माझ्या संघर्षमय जीवनाला सुरवात झाली. माझ्या वडिलांच्या जागेवर आई लोणी काळभोर फिलिप्स कंपनीत नोकरी करू लागली. चार लहान भावंडे होती. आईनंतर या सर्वांची जबाबदारी माझ्यावर आली. त्यांचं सर्व उरकून मी शाळेत जात असे. अशा बिकट परिस्थितीत शालेय शिक्षण पूर्ण केले.

पुण्यातील सेंट मिराज कॉलेजमध्ये बीए अर्थशास्त्र विषय घेऊन पदवी घेतली. त्या वेळी मुंढवा ते पुणे स्टेशन प्रवास कधी पायी; तर कधी बसने केला. एसपी कॉलेजमध्ये एमए पूर्ण केले. एसएनडीटी कॉलेजला बीएडसाठी नंबर लागला. याचवेळी लग्नासाठी आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील प्रा. पांडुरंग गायकवाड यांचे स्थळ आले. या गावचे प्रथम सरपंच (कै.) बाळासाहेब गावडे यांनी बोलणी करून, प्रा. पांडुरंग गायकवाड हे कष्टाळू व कर्तृत्ववान आहेत. संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून, नम्रता व शालीनता वाखाणण्यासारखी आहे. तुमचे भवितव्य निश्‍चित उज्ज्वल होईल, असा विश्वास दिला. दोन्ही कुटुंबांची सहमती मिळाल्यानंतर विवाह निश्‍चित केला. मुलगी नोकरीला लागावी, अशी अट माहेरच्यांची होती. 

विवाहानंतर यजमानांच्या नोकरीनिमित्त सोलापूर, नगर जिल्ह्यामधील महाविद्यालयामध्ये जाण्याची संधी मिळाली. सन १९८९ मध्ये प्रतीकचा व सन १९९२ मध्ये प्रतिमाचा जन्म झाला. मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावे, अशी इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे देता आले नाही. कारण, यजमानही कुटुंबात मोठे. त्यांच्या मागे शिकणारी चार भावंडे होती. प्रतिमा तीन दिवसांची असताना मी दुसऱ्यांदा एमए मराठी विषय घेतला. त्याच विषयात बीए पूर्ण केल. 

माढा, कोपरगाव, नगर असा प्रवास करत आम्ही मंचरला आलो. मी मलठण, कवठे, नारोडी, मंचर, म्हाळुंगे पडवळ, श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये सीएचबी पार्ट टाइम अशी १२ वर्ष नोकरी केली. या काळात माझी दोन मुले व यजमान यांचे फार मोठे सहकार्य लाभले. 

१६ ऑगस्ट २०१० मध्ये मी मंचर कॉलेजमध्ये ज्युनियर विभागाकडे कायमस्वरूपी लेक्‍चरर म्हणून काम करू लागले. त्या वेळी माझे यजमान मला प्राचार्य म्हणून लाभले. चि. डॉ. प्रतीक एमडी; तर डॉ. प्रतिमा बीडीएस होऊन वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. डॉ. प्रतीक याने मंचरला दवाखाना सुरू केला आहे. नुकतेच डॉ. प्रतिमा हिस १९ डिसेंबरला पुत्ररत्न झाले. मला आजी म्हणून बढती मिळाली. 

आज मागे वळून पाहता दोन्ही कुटुंबांतील सर्व भावंडे उच्चविद्याविभूषित होऊन वेगवेगळ्या व्यवसायात स्थिरावलेली आहेत. आयुष्याच्या जडणघडणीत यजमान प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, माझी दोन्ही मुले व दोन्हीही कुटुंबांतील सर्वच लोकांचा पाठिंबा मिळाल्याने आयुष्याची दमदार वाटचाल करू शकले. 

शिक्षण क्षेत्रात काम करीत असल्याने देश परदेशात जाण्याची संधी मिळाली. या पुढील आयुष्यात सुखी समाधानी राहावे व विद्यार्थ्यांना दिशादर्शक शिक्षण आमच्या दांपत्यांच्या माध्यमातून मिळावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Web Title: Inspirational story of Shila Gaikwad on the occasion of womens day