मोरपिसासम मुलायम; पण खंबीर आईसाहेब

Sumitra-Sherkar
Sumitra-Sherkar

कोणत्याही स्त्रीची किंमत ही तिला मिळणाऱ्या घरातील, समाजातील वागणुकीवर अवलंबून असते. शेरकर परिवारात सुमित्राआईंना नेहमीच आदर मिळत गेला. त्या स्वतःदेखील सगळ्यांचा आदर करत. दिवा बोलत नाही; पण त्याचा प्रकाश मात्र सर्वत्र पसरत असतो. 

मोरपिसा समान मुलायम असणाऱ्या तसेच सर्वांच्या पाठीशी तितक्‍याच खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आईसाहेब म्हणजे सुमित्राताई अशीच त्यांची ओळख......! असं म्हणतात, आयुष्यात गरजेपेक्षा अधिक मिळते, त्यास ‘नशीब’ म्हणतात; तर सर्व मिळूनही असमाधानी असणारा ‘कमनशिबी’ म्हणून ओळखला जातो. मात्र, जीवनात थोडं मिळूनही जो समाधानाने जगतो त्या व्यक्तिमत्त्वास ‘खूशनसीब’ म्हटले जाते. या जगात फक्त आणि फक्त समाधानी जीवन हे आपल्या आईचंच पाहायला मिळेल. श्रीमंताला जन्म देणारी आईच आणि गरिबालादेखील आईचीच कूस जन्म देत असते.
आकाश आणि आभाळ तसे दोन्ही शब्द सारखेच; परंतु निरभ्र आकाश वडिलांचे कर्तव्य, तर भरून आलेले आभाळ आईच्या संवेदना व्यक्त करते.

आकाशाचा कागद करून, समुद्राची शाई वापरूनही ज्या शब्दाची महती पूर्ण होऊ शकत नाही, त्या आईचे मोल आपण कधीही चुकवू शकत नाही.

काही व्यक्तीचे येणे हे त्या त्या घराण्याला मोठे करण्याचे काम करत असते. खामगावच्या दत्तात्रय घोलप यांच्या परिवारात जन्माला आलेले कन्यारत्न म्हणजे...आईसाहेब सुमित्रा..! त्यांना मातोश्री कलावती यांचे उत्तम संस्कार  मिळाले. तसे पाहिले तर कोणतेही संस्कार विकत घेता येत नाहीत, त्यासाठी उपजत सद्‌गुण अंगी असावे लागतात. वडील दत्तात्रय, आई कलावती, भाऊ ज्ञानेश आणि रमाकांत यांच्या उत्तम आणि भक्कम पाठबळावर आईसाहेब जुनी दहावी झाल्या.

स्वप्न तर सगळेच पाहतात; परंतु झोप उडवणारी स्वप्न फार कमी माणसे पाहतात. संसाररूपी स्वप्न पाहताना कर्तव्यदक्षता स्वीकारावी लागते.

वडिलांना एकवेळ मुलाची काळजी नाही वाटत, परंतु तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या मुलीची मात्र खूपच चिंता असते. तिचे कल्याण व्हावे, ही एकच गोष्ट वडिलांच्या डोक्‍यात घोळत असते; परंतु सर्वच गोष्टींनासुद्धा योग यावा लागतो. त्या वेळी स्व. नामदेवशेठ अर्जुन शेरकर यांचे चिरंजीव सोपानशेठ यांचे स्थळ चालून आल्यानंतर खरेच घोलप परिवाराची झोप उडाली. कारण, शेरकर परिवाराच्या पाठीमागे फार मोठा इतिहास होता.

स्व. नामदेवशेठ शेरकर यांचे चिरंजीव विघ्नहर कारखान्याचे संस्थापक व स्व. मा. खासदार निवृत्तीशेठ शेरकर म्हणजे देवमाणूस. त्याचे कारण म्हणजे स्वतःचा प्रपंच तर सगळेच करतात परंतु जगाचा प्रपंच करणारी माणसे ही विरळच असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी माळरानावर नंदनवन उभे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शेठबाबा. या शेठबाबांच्या कर्तृत्वाला खरी साथ लाभली ती पत्नी हिराबाईंची. ज्ञानदेवशेठ, नंदूशेठ यांचे बंधू सोपानशेठ त्या वेळचे इंजिनिअर. असे स्थळ आल्यामुळेच घोलप परिवाराला एक वेगळाच आनंद झाला. २५ मार्च १९७९ रोजी आईसाहेब अर्थात सुमित्राजींचा विवाह सोपानशेठ यांच्याबरोबर मोठ्या थाटामाटात झाला. 

माणूस कशात तरी रमून गेल्याशिवाय सुखी होऊ शकत नाही. यासाठी प्रपंचातील सर्व व्यक्तींना जपावे लागते. आपल्या प्रपंचात आईसाहेब रमल्या. शेठबाबानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची धुरा अण्णांकडे आली. जुन्नर तालुक्‍याची शान म्हणजे विघ्नहर कारखाना...! गोड स्वभावाच्या ‘अण्णां’नी विघ्नहरच्या प्रगतीसाठी आपला सगळा वेळ दिला. याकामी आईसाहेबांचे योगदान विसरून चालणार नाही. व्यक्तीचे मोठेपण हे तिच्या वयावर नव्हे; तर कर्तृत्वावर अवलंबून असते; परंतु अण्णांसारख्या कर्तृत्वाला खरी साथ लाभली ती सुमित्राआईची.

कोणत्याही स्त्रीची किंमत ही तिला मिळणाऱ्या घरातील, समाजातील वागणुकीवर अवलंबून असते. शेरकर परिवारात सुमित्राआईंना नेहमीच आदर मिळत गेला. त्या स्वतःदेखील सगळ्यांचा आदर करत. दिवा बोलत नाही पण त्याचा प्रकाश मात्र सर्वत्र पसरत असतो. अण्णांच्या संसार वेलीवर सत्यशीलदादा, अपर्णा, अक्षता ही सुगंधी फुले उमलली. त्यांचे बहरणे, हे त्या वेलीचे भूषण ठरावे, असेच होत गेले. या वेलीला खरी पाठराखण होती ती आईसाहेब सुमित्रा यांची. मातीने माझ्यासाठी काय केले, यापेक्षा मी मातीसाठी काय करू शकतो, या विचाराने सर्वच जण समाजसेवेने प्रेरित झाले.

आयुष्यात प्रत्येकाच्या पाठीमागे सुख व दु:ख पाठशिवणीचा खेळ खेळत असते. जीवन हे आघातानेच पुढे जात असते. शेरकर परिवाराला तसेच जुन्नर तालुक्‍याला शेठबाबांनंतर, स्व. सोपानशेठ यांचा आघात सहन करावा लागला. अशावेळी ‘विघ्नहर’चे काय होणार, हा एकच प्रश्न जनतेपुढे होता. पण ‘देव तारी त्याला कोण मारी...’? अण्णांचे जाणे, हा आईसाहेबांना मोठा धक्काच होता. अशावेळी सत्याचे व शिलाचे आचरण करणारे दादा अर्थात सत्यशीलदादा याकामी पुढे आले. प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर होते की, या नवशिक्‍या व्यक्तीला हे वज्र पेलवेल का? पण तिथेही आईसाहेबांचे कर्तव्य व संस्कार कामाला आले आणि सगळ्या टीकाकारांची तोंड गप्प झाली. ‘विघ्नहर’च्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध संचालक मंडळ तयार झाले होते. हे कर्तृत्व होते सत्यशीलदादांचे; परंतु संस्कार मात्र होते आईसाहेबांचे. म्हणूनच हे सहज शक्‍य झाले!

आईसाहेबांनी हा संस्कार पेरताना एकच सांगितले होते, ‘पाण्याने अंघोळ करणारा कपडे बदलतो; पण घामाने अंघोळ करणारा इतिहास बदलतो.’ आज जुन्नर तालुक्‍यामध्ये विघ्नहर परिवाराचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा आहे. या स्वराज्याचे देखणे स्वप्न राजमाता जिजाऊनी पाहिले आणि त्या देखण्या स्वप्नाला स्वराजाचे सुराज्य निर्माण करण्याची कर्तव्यतत्परता शिवरायांनी दाखवली. म्हणून जनता सुखी आहे. तद्‌वत ‘विघ्नहर’चे देखणे स्वप्न पाहून सत्यात आणले शेठबाबांनी, त्याला मूर्तरूप दिले अण्णांनी आणि याच ‘विघ्नहर’चा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला तो सत्यशीलदादांनी...! धवल, रुही आणि ध्रुव आज त्याचे साक्षीदार आहेत; परंतु या सर्वांच्या पाठीशी अगदी मोरपिसासारख्या मुलायम परंतु तितक्‍याच खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या ‘आईसाहेब सुमित्रा’! त्यांच्या कार्यकर्तृत्वाला व मातृत्वाला मानाचा मुजरा..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com