स्वकर्तृत्वाने मिळविली ओळख

सौ. क्रांती सोमवंशी
शुक्रवार, 15 मार्च 2019

कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शेतीत काम करण्याबरोबरच शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती. गावातील दारूबंदीपासून सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी राजगुरुनगर येथे ‘पालवी सामाजिक संस्था’ स्थापन केली.

कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शेतीत काम करण्याबरोबरच शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती. गावातील दारूबंदीपासून सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी राजगुरुनगर येथे ‘पालवी सामाजिक संस्था’ स्थापन केली.

सतत प्रेरणास्थानी असणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे या आदर्श व्यक्तिमत्त्वामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी काहीतरी करून दाखवण्याचा आत्मविश्वास बालपणापासूनच मनात होता. बालपण नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे गेले. सात भावांच्या कुटुंबात वडील गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्‍टर तर, आई अशिक्षित होती. शिक्षण कमी असूनही मात्र शिक्षणास प्रोत्साहन देणारी आई आणि मोठ्या बहिणीच्या पाठबळामुळे पैठण येथे एफ. वाय. बीए पर्यंत शिक्षण झाले. 

शिक्षण चालू असतानाच ज्ञानेश्वर कड (सध्या मुख्याध्यापक - मामासाहेब मोहोळ विद्यालय, सायगाव) यांच्याशी विवाह झाला. ते स्वभावाने शांत व समंजस तसेच शिक्षकी पेशामुळे त्यांनी पुढील शिक्षणास प्रोत्साहन दिले. परंतु नोकरी करण्यास मात्र विरोध होता. लग्नानंतरचा काळ संघर्षात गेला.

सासर आणि माहेर यांच्या रूढी-परंपरा, विचार व जीवन पद्धती भिन्न असल्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेत संसार केला. शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण बटाटे कुठे येतात? भुईमुगाला शेंगा कुठे असतात, शेणाने कसे सारवायचे, चुलीवरील स्वयंपाक, याची काहीच माहिती नव्हती. पण पतीची साथ व कष्ट करण्याच्या संस्कारामुळे आत्मविश्वासाच्या बळावर यातून निभावून नेले. पतीच्या पाठबळामुळे शेती करता करता मुले, सासू-सासरे यांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षण चालू ठेवले. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यपालन, शेळीपालन, गांडूळखत निर्मिती, मल्चिंगवरील भाजीपाला, दुग्धव्यवसाय यशस्वी करून दाखवला. स्वतः मार्केटिंग सुद्धा केले. प्रापंचिक जबाबदारी सांभाळून रोज कडूस ते पुणे असा शंभर किलोमीटरचा प्रवास करीत एमएसडब्लू (मास्टर ऑफ सोशल वर्क) पूर्ण केले. काउन्सलरची पदवी मिळवली. समाजकार्याचीसुद्धा आवड होती.

कधी कधी एखाद्या प्रसंगामुळे जीवनाला अचानक कलाटणी मिळते. तशीच कलाटणी कडूस गावाला दारूबंदी केल्यामुळे मिळाली. व्यसनाधीन झालेली तरुण पिढी वाचवण्यासाठी महिलांना संघटित करून गावात दारूबंदी करण्याचा संकल्प केला. तो अथक प्रयत्न करून पूर्णत्वास नेला. त्यातून आत्मविश्वास बळावला. सुरवातीला पोलिस अधिकाऱ्यांपासून गावातील पुढाऱ्यांनी सुद्धा दारूबंदीला विरोध केला. पण पथनाट्ये, जनजागृती अभियान राबवीत महिलांच्या मदतीने गावात दारूबंदीसाठी अनुकूल वातावरण तयार केले. एकीला एक महिला जोडत गेलो आणि बघता बघता २ फेब्रुवारी २००९ रोजी महिलांच्या मतदानातून गाव दारूमुक्त करण्यात यश मिळवले. 

जिल्ह्यात गवगवा झाला. त्या दिवशी गावच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली की डीजेच्या आवाजात निघालेल्या विजयी मिरवणुकीत गावातील सर्व महिला गुलाल उधळून नाचत आनंदोत्सव साजरा करीत होत्या, तर पुरुष मंडळी मात्र रस्त्याच्या दुतर्फा, दुकानांसमोरील ओट्यावरून शांतपणे उभे राहून हे बघत होती. याच बळावर तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदी निवडून येण्याचे भाग्य मिळाले. यातून सामाजिक काम करण्याची संधी मिळाली. या वेळी महिलांच्या कौटुंबिक हिंसाचारापासून ते वैयक्तिक पातळीवरील अनेक समस्यांची जाण झाली.

महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी चाकणच्या समता सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका सिंधूताई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर येथे ‘पालवी सामाजिक संस्था’ स्थापन केली.

कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू केले. समुपदेशन करीत आहे. त्यातून अनेकांचे कौटुंबिक कलह सोडवले. अनेक संसार टिकवले. तुटणारी नाती जोडली. पोलिस ठाण्यात जाण्याअगोदर तडजोडीतून संसार सुखाचे केले व वाद सोडवले. यातून मोठे समाधान मिळत आहे. रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेती सुरू केली. पन्नास शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीचा गट तयार करून ५० एकर क्षेत्र सेंद्रिय पद्धतीने शेती व्यवसाय सुरू केला. यासाठी कृषी विभाग पुणे व कृषी खात्याच्या ‘आत्मा’चे दिनेश सावंत यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

महिला बचत गटांना मार्गदर्शन व सल्ला देत आहे. खेड पोलिस ठाण्याच्या सुरक्षा समिती व कृषी विभागाच्या ‘आत्मा’ समितीच्या सदस्या म्हणून काम करीत आहे. सामान्य गृहिणीचे मर्यादित आयुष्य जगण्यापेक्षा स्वच्छंदी जीवन जगून स्वकर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली, याचे मोठे समाधान आहे. पण पतीचा मिळालेला बहुमोल पाठिंबासुद्धा विसरले नाही.

यापुढेही नातेवाईक, मित्रमैत्रिणी व मार्गदर्शकांच्या ऋणात राहून पुढील सामाजिक काम करण्याचा निर्धार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Surekha Kad on the occasion of womens day