समाजसेवेचे व्रत घेतलेल्या शिंदेताई

Vijayatai-Shinde
Vijayatai-Shinde

राजगुरुनगर बॅंकेच्या माध्यमातून दीनदुबळ्यांचे संसार उभे करण्यासाठी विजयाताई झटत आहेत. त्यामुळेच त्या गरिबांच्या ‘शिंदेताई’ म्हणून ओळखल्या जातात. राजकीय व सामाजिक प्रवासामुळे सध्याच्या पैसेवाल्यांच्या झगमगाटाच्या दुनियेतसुद्धा त्या कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत आहेत.

सुशिक्षित कुटुंबात विजयताईंचा जन्म झाला. वडील बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये क्‍लासवन अधिकारी, तर आई महिला बचत गटाच्या चळवळीमधील राज्यातील पहिल्या बचत गटाच्या अध्यक्षा. लहानपणापासूनच स्वभाव धाडसी, धीट होता. मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील पालकांमधून अनुकूलता नसताना दहावीच्या पुढे शिकणारी गावातील पहिली मुलगी, सायकल चालवणारी, दारूड्यांना फटके देणारी अशी त्यांची शाळेत जातानाच प्रतिमा झाली होती. तीच प्रतिमा पुढे गेल्या तीस वर्षांहून अधिककाळ सामाजिक काम करताना त्यांनी टिकवून ठेवली आहे. शिवसेना पक्षातून सामाजिक कामाला सुरवात केली. गरीब, दलित, दुबळ्यांच्या समस्या प्रामुख्याने महिलांच्या संदर्भातील कौटुंबिक, सार्वजनिक समस्या

सोडविण्यास त्यांनी कायमच प्राधान्य दिले. अनेकांच्या मदतीला धावून जाता जाता अनेकांच्या घरांतील कौटुंबिक कलह मिटविण्यासाठी त्यांनी समजूत काढून तर कधी कठोरपणाचा अवलंब करून मार्ग काढले. त्यामुळे अनेक संसार टिकवले. तुटणारी नाती जोडली. परंतु १९९६ मध्ये नेतृत्वाखाली झालेल्या महिलांच्या आंदोलनामुळे वाफगाव (ता. खेड) येथील शासनमान्य दारूविक्री दुकान बंद केल्याच्या घटनेने सामाजिक कामाला कलाटणी मिळाली. दारूमुळे संसार उद्‌ध्वस्त होत असल्याने येथील दुकानच बंद करावे, अशी अपेक्षा येथील महिलांची होती. गावातील महिलांना बरोबर घेऊन आंदोलन उभे केले. त्यात गावातील चौदा वर्षांच्या मुलींपासून ऐंशी वर्षांच्या आजींनी सहभाग घेतला होता. या घटनेतून मोठा आत्मविश्‍वास त्यांना मिळाला.

महिलांना सोबत घेऊन दारूबंदीची चळवळ उभी केली. अनेक गावांतील गावठी दारूभट्ट्या उद्‌ध्वस्त केल्या. कडूस, चास गावात महिलांच्या मतदानातून दारूबंदी करण्यात यश मिळवले. रेटवडी (ता. खेड) येथील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली होती. याबाबत अडीच महिने विविध आंदोलने केली. या मुलींना संगमनेर येथील एका टोळीने पळवून नेऊन भोपाळ (मध्य प्रदेश) येथे विक्री केल्याची माहिती मिळाली.

पोलिसांकडे पाठपुरावा केला. संगमनेर येथील या टोळीच्या वस्तीत घुसण्यास पोलिस धजावत नसताना स्वतः महिलांना सोबत घेऊन प्रवेश केला. टोळीची प्रमुख असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा न्यायालयात पाठपुरावा केला. अखेर त्या महिलेला सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा मिळाली. मांदोशी (ता. खेड) येथे सवर्ण-दलित असा अनेक वर्षांपासून संघर्ष होता. काही केल्या वाद मिटत नव्हता. यात अनेकांनी जीव गमावले होते. वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. पोलिसांना बरोबर घेऊन गावकऱ्यांसोबत बसून हा वाद कायमचा मिटविण्यात यश आले. धाडसाच्या बळावर गर्दीत, समुदायात घुसून अशी अनेक प्रकरणे तडीस नेली आहेत.

लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या सोडविण्याच्या बळावरच जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या राजगुरुनगर सहकारी बॅंकेच्या संचालकपदी गेल्या चार पंचवार्षिक निवडून येत आहे. बॅंकेच्या माध्यमातून शेतकरी, बेरोजगार तरुण व महिलांना दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालनसारखे अनेक व्यवसाय उभे करण्यासाठी मदत केली आहे. गेली पंचवीस वर्षे बँकेच्या माध्यमातून व शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक सेवा सुरू आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना तारेवरची कसरत करीत समाजाची सेवा सुरू आहे. पैशापेक्षा माणसे कमाविण्याला विजयताईंचे प्राधान्य आहे. धीट, धाडसीवृत्ती विजयताईंची शिदोरी आहे. या शिदोरीवर निष्ठा, चिकाटी, जिद्द, कणखरपणा आणि सडेतोडपणा अंगीकारून समाजासाठी सतत प्रवाहाच्या विरुद्ध करावी लागलेली त्यांची समाजकारणात व राजकारणातील वाटचाल वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच गरीब, दीनदुबळे व शोषितांकडून विजयाताईंना मिळालेली ‘शिंदेताई’ ही ओळख सर्वकाही सांगून जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com