मुळशी आपत्ती व्यवस्थापन ठरले देवदूत

maval
maval

कोळवण (पुणे) : मुळशी व मावळ तालुक्‍यात गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पुरात अडकलेल्या नागरिक, पर्यटक, महसूल व पोलिस प्रशासनाला मुळशी आपत्ती व्यवस्थापन कोणतीही अपेक्षा न बाळगता अनेकदा जीव धोक्‍यात घालून मोठी मदत करत आहे. त्यांच्या या कामाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 

मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकात प्रमोद बलकवडे, ओंकार बलकवडे, सनी शिर्के, नागेश धनवे, गौरव धनवे, शुभम धनवे, विष्णू गोडांबे, अमोल खानेकर, भरत गुप्ता यांच्याबरोबर आणखी काही तरुण निरपेक्ष भावनेने काम करत आहेत. पावसाने थैमान घालायला सुरवात केल्यापासून ते अविरतपणे नागरिकांच्या मदतीला धावून जात आहेत. या पथकाने शेरे गावातील दोन शेतकऱ्यांची, पुराच्या पाण्यात अडकलेल्या जनावरांची सुटका केली. येथील एका शेतकऱ्याचा गोठा पाण्यामध्ये गेला होता. त्यामुळे पथकातील सदस्य बोटीने गोठ्याजवळ जाऊन ही जनावरे सोडून त्यांना पाण्याबाहेर घेऊन आले. दोन्ही शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुटल्यामुळे सुटकेचा निःश्‍वास सोडला. घोटावडे येथील भरे पुलाजवळून वाहणाऱ्या मुळानदीच्या पुराच्या पाण्याने वेढलेला महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर बंद करण्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या सदस्यांची अनमोल मदत झाली. 

गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेला रिहे फीडर चालू झाला आणि रिहे खोरे आणि परिसरातील सर्व गावे प्रकाशमान झाली. माले येथील सेरानो फार्मस येथे धरणाच्या पाण्यामुळे घाबरून अडकलेल्या आठ महिलांना स्थानिक नागरिक व मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या सदस्यांनी सुखरूप बाहेर काढले. मुळशी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे वेढलेल्या भागात मुळशी आपत्ती व्यवस्थापनातील सदस्य तीन दिवस अहोरात्र गस्त घालत होते. 
मावळ तालुक्‍यातील टाकवे गावाजवळ इंद्रायणी पुलावरून स्विफ्ट डिझायर मोटार पुलाचा कठडा तोडून इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडली होती. या गाडीत तीन जण होते. यातील एकजण पोहता येत असल्याने बाहेर आला. मात्र, दोघांचा पत्ता लागत नव्हता. शोधपथकाने गाडी बाहेर काढली. त्यातील एकाचा मृतदेह आढळला. पण, दुसऱ्या तरुणाचा शोध लागला नाही. हा शोध घेत असताना नाणे येथील हरवलेल्या एकाचा मृतदेह मुळशी आपत्ती व्यवस्थापनाला सापडला. 

पथकाला साहित्याची गरज 
कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मुळशी आपत्ती व्यवस्थापन सदस्य काम करीत आहेत. त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी गाडी, बोट, लाइफ जॅकेट व इतर साहित्य कमी पडत आहे. हे साहित्य शासन अथवा समाजसेवी संस्थांमार्फत मिळावे, अशी मागणी पथकाचे सदस्य प्रमोद बलकवडे यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com