#PuneTraffic कारवाईऐवजी पोलिस करणार प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - प्रवेश बंदच्या वेळेत संभाजी पुलावरून जाणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाईऐवजी पोलिसांकडून त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयोग राबविला जात आहे. या पुलावरून दुचाकींना प्रवेश बंदच राहणार असून, नियम मोडणाऱ्यांचे प्रबोधन करण्यावर यापुढे भर राहणार आहे.

पुणे - प्रवेश बंदच्या वेळेत संभाजी पुलावरून जाणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाईऐवजी पोलिसांकडून त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयोग राबविला जात आहे. या पुलावरून दुचाकींना प्रवेश बंदच राहणार असून, नियम मोडणाऱ्यांचे प्रबोधन करण्यावर यापुढे भर राहणार आहे.

खंडुजीबाबा चौक ते टिळक चौकाकडून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत या पुलावरून दुचाकींना बंदी आहे. असे असतानाही दररोज दुचाकीस्वार पुलाचा वापर करतात. त्यामध्ये बहुतांश दुचाकीस्वारांना या पुलावरील "नो एंट्री'बाबतची माहिती नसते. दरम्यान, पुलाच्या दोन्ही बाजूंना थांबणारे वाहतूक पोलिस याच दुचाकीस्वारांना "सावज' करत असल्याचे चित्र दररोज दिसते. पोलिसांच्या या छुप्या कारवाईमुळे ते अनेकदा टीकेचे धनी ठरतात. वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी या पुलाचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रबोधन करा, कारवाई शिथिल करा, असे आदेश विश्रामबाग व डेक्कन वाहतूक विभागाला दिले होते. तरीही पोलिसांकडून "सावज' टिपण्याचे काम सुरूच होते.

वाहतूक शाखेच्या डेक्कन विभागाच्या एका अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांसाठी काढलेले एक कार्यालयीन परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामध्ये वाहनचालकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांचे प्रबोधन व वाहतुकीचे नियमन करा, असे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात मात्र संभाजी पूल दुचाकींसाठी खुला झाल्याची चर्चा सुरू झाली होती; परंतु संभाजी पूल दुचाकीसाठी नेहमीप्रमाणे बंद आहे, फक्त पुलावरून नव्याने येणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रबोधन, वाहतुकीचे नियमन करण्यावर भर दिला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

संभाजी पुलाचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई न करता, पुलाच्या दोन्ही बाजूंना थांबणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित दुचाकीस्वारांना ठरावीक वेळेत पुलाचा वापर करू नये, अशा स्वरूपाचे प्रबोधन करावे. याबाबतच्या सूचना संबंधित पोलिसांना दिल्या आहेत.
अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

Web Title: Instead of taking action the police will be aware people