सार्वजनिक शौचालये, मुतारींची संख्या अपुरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे शहरांत सार्वजनिक शौचालय आणि मुतारींची संख्या अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक आणि वस्ती भागांत एकुण 1 हजार 332 इतकीच शौचालये आहेत. त्यामधील सीट्‌सची संख्या 16 हजार 841 असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

पुणे - लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे शहरांत सार्वजनिक शौचालय आणि मुतारींची संख्या अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक आणि वस्ती भागांत एकुण 1 हजार 332 इतकीच शौचालये आहेत. त्यामधील सीट्‌सची संख्या 16 हजार 841 असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

नगरसेविका छाया मारणे यांनी यासंदर्भात ऑगस्ट महिन्याच्या मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवर विचारलेल्या प्रश्‍नातून ही माहिती पुढे आली आहे. शहराची लोकसंख्या 34 लाख झाली आहे. सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीच्या निकषानुसार प्रती 35 ते 50 व्यक्तींमागे एक सार्वजनिक शौचालय असणे आवश्‍यक आहे. मुख्य रस्ता, बाजार पेठेचा परिसर अशा ठिकाणी प्रति अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सार्वजनिक मुतारी असणे आवश्‍यक आहे. महापालिका हद्दीत सार्वजनिक आणि वस्तीभागातील एकुण 1 हजार 332 शौचालये आहेत. यामध्ये एकुण 16 हजार 841 सीट्‌स आहेत. महिलांकरिता सार्वजनिक शौचालयांतील सीट्‌सची संख्या 2 हजार 463 इतकी आहे. वस्ती पातळीवर महिलांकरिता असलेल्या शौचालयातील सीट्‌सची संख्या 5 हजार 406 इतकी आहे. महिलांच्या शौचालयांतील सीट्‌सची संख्या वस्तीपातळीवर जास्त आहे. 

लोकसंख्येच्या निकषाचा विचार करता पुण्यात प्रति 50 व्यक्तींमागे एक याप्रमाणे सुमारे 68 हजार इतक्‍या सार्वजनिक शौचालयांची उभारणी करावी लागेल. याकरिता जागाही आवश्‍यक आहे. अनेक ठिकाणी नागरीक हे त्यांच्या जवळ असलेल्या जागेत उभारण्यास नकार देतात तर, अस्तित्वात असलेली सार्वजनिक शौचालय आणि मुतारी हलविण्याची मागणी करीत असतात. याची अडचण प्रशासनाला भेडसावते. या शौचालयांची साफसफाई हादेखील महत्त्वाचा प्रश्‍न झाला आहे. पंधरा क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या 134 सार्वजनिक शौचालयांची देखभाल, साफसफाई करण्यासाठी केअर टेकर्स नियुक्त केले आहेत. साफसफाईच्या प्रश्‍नामुळेच सशुल्क शौचालय ही संकल्पना पुढे आली आहे. ती काही प्रमाणात यशस्वीही ठरली आहे.

Web Title: Insufficient public toilets in pune