विमा कंपनीच्या कार्यालयाची शिवसेनेकडून तोडफोड (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
कोरेगाव पार्क पोलिसांनी शिवसेनेच्या ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मनीषा टुले यांनी दिली. इफ्को-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीचे संचालक जयेश त्रिवेदी यांनी फिर्याद दिली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीत कंपनीचे तब्बल सात ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पुणे - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात दिरंगाई करीत असल्याच्या आरोपावरून शिवसैनिकांनी इफ्को टोकिओ या विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रस्त्यावर असलेल्या कार्यालयात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

या कार्यालयात दैनंदिन कामकाज सुरू होते. त्या वेळी सुमारे ३० शिवसैनिक तिथे घुसले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे तातडीने मिळावेत, या मागणीसाठी हे हिंसक आंदोलन करण्यात आले. यापूर्वी वेळोवेळी निवेदने देऊनही कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

वेळेत नुकसानभरपाई मिळत नसल्याने दुष्काळग्रस्त शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सुक्‍या दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. असे असताना आता ओला दुष्काळ पडला. याबाबत राज्याच्या कृषी विभागाकडून माहिती घेतली असता हजारो शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे समोर आले. नगरसेवक विशाल धनवडे, परेश खांडगे, सूरज लोखंडे, सनी गवते, राम थरकुडे, संजय वाल्हेकर, युवराज पारीख, अनिल दामजी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: insurance company office damage by shivsena crime