‘बुद्धिवंत महापालिका’ अशी ओळख निर्माण करा - जानकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

माझ्याकडील खाते टाकाऊ 
जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. माझ्याकडे भाजप सरकारने टाकाऊ खात दिले. छोटा पक्ष म्हणून त्यांनी तसे केले. पण, तुम्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे तशा दृष्टीने पाहू नका. या शाळांवर व्यवस्थित लक्ष दिले, तर उद्याचा दिवस चांगला येईल. जानकर यांनी आपल्या खात्याचे बजेट वाढवण्यात आल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा ‘स्मार्ट’ करण्यासाठी दहा लाखांचा निधी जाहीर केला.

पिंपरी - ‘अध्यापनात पारंपरिक पद्धतीपेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. श्रीमंत महापालिकेबरोबरच ‘बुद्धिवंत’ महापालिका अशी ओळख निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. केवळ शिक्षकच सुसंस्कृत आणि आदर्श पिढी घडवू शकतात. अशा गुणवंत शिक्षकांच्या पाठीशी सरकार आणि समाज नक्की उभा असेल,’’ असे प्रतिपादन पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केले. 

चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिकेतर्फे आयोजित ‘आदर्श शिक्षक’ व ‘आदर्श शाळा’ पुरस्काराचे वितरण मंत्री जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, शिक्षण सचिव नंदकुमार, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडीगेरी, शिक्षण समितीच्या सभापती मनीषा पवार, सदस्य भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते नाना काटे, प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे, शिवसेनेचे राहुल कलाटे, नगरसेविका वैशाली काळभोर, योगिता नागरगोजे, नगरसेवक नामदेव ढाके उपस्थित होते. जानकर म्हणाले, ‘‘ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. त्यांची किती मुले महापालिका आणि जिल्हा परिषद शाळेत शिकतात, याचे उत्तर मला माहीत नाही. परंतु, शिक्षकांनी भविष्यात शास्त्रज्ञ होणारे विद्यार्थी घडविले पाहिजेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intellectual Municipality Mahadev Jankar