ग्रामीण भागात आंतरजातीय विवाहसमारंभास लोकमान्यता

राजेंद्र सांडभोर 
शनिवार, 30 जून 2018

काळाबरोबर समाजाच्या चालीरीती हळूहळू बदलत असतात, तसे लग्नसमारंभांचे स्वरूपही बदलत चालले. मात्र लग्नपद्धतीत कितीही बदल झाले तरी जातीच्याबाबत लोक आग्रही राहिले. त्यामुळे आंतरजातीय विवाहसमारंभ हे फारतर अतिउच्च्भ्रू समाजातच होत असत.

राजगुरूनगर : खेड तालुक्यात आणि एकूणच उत्तर पुणे जिल्ह्यात आंतरजातीय विवाहसमारंभांना आता मान्यता मिळू लागली आहे. अनेक आईवडील आपल्या मुलामुलींचे आंतरजातीय लग्नही रितीरिवाजाप्रमाणे आणि धुमधडाक्यात लावून देताना गेल्या तीन चार वर्षांपासून आढळत आहेत. राजगुरूनगर परिसरात यावर्षी असे दहा ते पंधरा विवाह मंगल कार्यालयांमध्ये झाले. 

काळाबरोबर समाजाच्या चालीरीती हळूहळू बदलत असतात, तसे लग्नसमारंभांचे स्वरूपही बदलत चालले. मात्र लग्नपद्धतीत कितीही बदल झाले तरी जातीच्याबाबत लोक आग्रही राहिले. त्यामुळे आंतरजातीय विवाहसमारंभ हे फारतर अतिउच्च्भ्रू समाजातच होत असत. आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्यांना पळून जाऊन किंवा सरकारी विवाहनोंदणी कार्यालयात जाऊन लग्न लावण्याशिवाय पर्याय नव्हता. पुण्यामुंबईसारख्या शहरांत अलीकडच्या दोन दशकांमध्ये काही प्रमाणात वाजतगाजत आंतरजातीय विवाहसमारंभ होऊ लागले, तरी ग्रामीण भागात तसे करण्यास कोणी धजावत नव्हते.

पण अलीकडे ग्रामीण भागातही 'करिअरिस्ट' मुलामुलींची संख्या वाढत चालली. त्यामुळे आपापले जीवनसाथी आपण निवडण्याइतका धीटपणा ती मुले दाखवू लागली. हळूहळू ग्रामीण भागातील पालकही एकाच जातीतील प्रेमविवाह मांडवात लावून देऊ लागले आणि आता आंतरजातीय प्रेमविवाहही लावून देण्याची मानसिकता ते स्वीकारू लागले आहेत. विशेषतः इतर मागासवर्गीय जातींमध्ये हे प्रमाण जास्त आहे. तसेच मराठा जातीच्या लोकांची संख्या जास्त असल्याने मराठा आणि इतरजातीय असेही विवाह होताना दिसत आहेत. 

धीरज घुमटकर ( चंद्रमा मंगल कार्यालय ) ;- आमच्या कार्यालयात यावर्षी आठ ते दहा आंतरजातीय विवाह झाले. गेल्यावर्षी हि संख्या कमी होती. 

बाळासाहेब वाघमारे ( नीलकमल मंगल कार्यालय) ;- आमच्याकडे दोन तीन आंतरजातीय विवाह झाले. गेल्यावर्षीही तीन आंतरजातीय लग्ने झाली होती. 

बाजीराव जाधव ( भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, चाकण ) ;- आमच्या कार्यालयात यावर्षी तीन आंतरजातीय विवाह झाले. अलीकडे प्रेमबंधनात असलेल्या मुलामुलींचे लग्न करून देण्यास पालक संमती देऊ लागले आहेत. चाकण परिसरात अनेक असे विवाहसमारंभ होताना दिसत आहेत. 

Web Title: Inter caste marriage on rural area