पुण्यात पार पडला आंतरजातिय सामुदायिक विवाह सोहळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

सामाजिक बांधिलकी जोपासत शिवराया तरुण मंडळाने दोन जोडप्यांच्या आंतरजातीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा करून एक आगळा वेगळ्या पद्धतीने गणेश जयंती साजरी केली.

कॅन्टोन्मेंट : मजूर, कामगारवर्ग  व आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या कुटूंबाला आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च न पेलवणारा असतो, त्यामुळे लग्नकार्यासाठी कर्ज काढणे, साधन-संपत्ती गहाण ठेवणे अथवा विकणे अशा अनेक नाईलाजाच्या माध्यमातून पैशाची जुळवाजुळव करावी लागते. त्यामुळे यातूनच  कर्जबाजारीपण कुटुंबावर येऊन टेकते. अशावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत शिवराया तरुण मंडळाने दोन जोडप्यांच्या आंतरजातीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा करून एक आगळा वेगळ्या पद्धतीने गणेश जयंती साजरी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्री गणेश जयंतीचे मुहूर्त साधून हा विवाह सोहळा महात्मा फुले पेठ पिंपळमळा येथे संपन्न झाला.  गणेश जयंती निमित्त दरवर्षी मंडळामार्फत  क्रीडा, सांस्कृतिक व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यावेळी कार्यक्रमावर होणारा  अनावश्यक खर्च टाळून यंदा मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीचा उपक्रम मंडळाने हाती घेतला आहे. हा उपक्रम राबविण्याचे  मंडळाचे प्रथमच वर्ष आहे. विशेष म्हणजे यासोहळ्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वखर्चाची देणगी गोळा करून व एकाच महिन्यात गरजू कुटूंबातील जोडप्यांना शोधून हा सोहळा संपन्न केला.त्यामुळे  हुंडा, मानपान, रुखवत, जेवणावळी व न परवडणाऱ्या गोष्टीचा मोठ्या  व्यापापासून या  कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी वधू व वरांकरिता हळद, साखरपुडा व लग्नासाठीचा पेहराव, मंगळसूत्र, पैंजण, रुखवत, संसार उपायोगी भांडी, बांगड्या, पूजेचे सामान  आदी साहित्य सामग्री देण्यात आले. तसेच बँड, ढोल, झाँज पथक वाजत गाजत घोड्याच्या बग्गीत पारंपरिकपद्धतीने वरांची वरात काढण्यात आली.

पूर्व भागात प्रथमच असा सोहळा पार पडत असल्याने राजकीय, सामाजिक, स्थानिक कार्यकर्ते व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

या सोहळ्याचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, कार्याध्यक्ष राहुल परदेशी, ऍड सागर काळे, आकाश भंडारी, कैलास गायकवाड, अतुल काळे, नवनाथ रासकर, रुपेश शहा, अप्पा बाजारे, निखेश वाव्हळ, कपिल भंडारी व आदींच्या सहकार्याने करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: intercast community marriage ceremony at Pune