आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीकडून 17 बॅंकांवर दरोडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

पुणे - राज्यातील जिल्हा बॅंकांच्या 17 शाखांवर दरोडा टाकून ऐवज लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीस ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. दरम्यान, पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून 20 लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम जाधव यांनी दिली.

पुणे - राज्यातील जिल्हा बॅंकांच्या 17 शाखांवर दरोडा टाकून ऐवज लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीस ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. दरम्यान, पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून 20 लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम जाधव यांनी दिली.

सचिन अप्पा इथापे (वय 27), पृथ्वीराज ऊर्फ पतंग दत्तात्रेय माने (वय 27, रा. कन्हेरगाव, ता. माढा), माउली ऊर्फ पिंट्या शिवाजी सरडे (वय 23), प्रियांका दीपक देशमुख (वय 23), सतीश अप्पा इथापे (वय 30) आणि मंगल अप्पा इथापे (वय 46, तिघे रा. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत इथापे आणि त्याचा साथीदार माउली जगन्नाथ लोकरे यांनी सप्टेंबर महिन्यात बॅंक रखवालदारास मारहाण करून 65 लाखांची रोकड लुटली होती. दरम्यान, आरोपी इथापे आणि लोकरे हे चाळीसगाव येथे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक राम जाधव, सहायक निरीक्षक राजेश रामाघरे, विनोद घोळवे, उपनिरीक्षक अंकुश माने, कर्मचारी डी. एच. गिरमकर, सचिन मोरे, बाळासाहेब सकाटे, चंद्रकांत वाघ आणि नीलेश कदम यांचे पथक चाळीसगाव येथे गेले. पोलिसांनी इथापेला अटक केली. त्या वेळी त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. तपासादरम्यान आरोपीने स्थावर मालमत्ता घेतलेल्या साथीदारांची नावे सांगितली. आरोपींनी नाशिक, धुळे, नगर, औरंगाबाद, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील जिल्हा बॅंकेच्या शाखेत दरोडा टाकल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे करीत आहेत.

Web Title: interdistrict robber gang 17 banks dacoit