राष्ट्रवादीच्या नाराजीचा भाजपला फायदा

राष्ट्रवादीच्या नाराजीचा भाजपला फायदा

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कळस-धानोरी प्रभागावर या निवडणुकीत भाजपने कब्जा केला आहे. राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला आपल्याकडे खेचत, तर दुसऱ्या नगरसेवकाच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने आपले बस्तान बसविले. मात्र, रेखा टिंगरे यांच्यावर मात करण्यात भाजपला अपयश आले. भाजपला तीन व राष्ट्रीवादीला एका जागेवर यश मिळाले आहे. प्रभागातील ५८९३ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. 

राष्ट्रवादीला मानणाऱ्या इथल्या मतदारांनीही लोकसभा, विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपला साथ दिली. मात्र, महापालिका निवडणुकीत हा मतदार राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहील, अशी शक्‍यता होती. परंतु तसे घडले नाही. राष्ट्रवादी तिकीट देणार नाही याचा अंदाज आल्यामुळे अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने सतीश म्हस्के या ‘विद्यमानां’ना उमेदवारी नाकारत दिनेश ऊर्फ बंटी म्हस्केंना संधी दिल्याने त्यांची नाराजी ओढवली. दुसऱ्या बाजूला रेखा टिंगरे यांचे काम आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्केंच्या अनुभवाच्या जोरावर राष्ट्रवादीने चांगली लढत दिली, तरी त्यांना अपयश आले. 

शहरात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली. मात्र, या प्रभागातील ‘अ’ गटात दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या ऐश्‍वर्या जाधव यांना ९५४९ मते मिळाली, तर चलवादी यांना ४३९१. दोन्ही पक्षांची मते एकत्र केल्यास ती १३९४० इतकी होतात. तर भाजपच्या किरण जठार यांनी ११८३० इतकी मते मिळवीत बाजी मारली. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असते, तर त्यांचा उमेदवार निवडून आला असता. ‘ब’ गटात भाजपच्या मारुती सांगडे यांना १४५६० मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या विठ्ठल कातोरे यांना १२१५० मते मिळाली. सांगडे हे २४१० च्या मताधिक्‍याने विजयी झाले. मागासवर्ग महिलांच्या ‘क’ गटामध्ये राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे यांनी १५७४३ मते घेत विजय मिळविला. इथे भाजपच्या अलका खाडे यांनी ९६७२ इतकी मते घेत चांगली लढत दिली. मात्र, टिंगरे यांना तब्बल ६०७१ इतके मताधिक्‍य मिळाले. या प्रभागात सर्वाधिक चुरशीची लढत म्हणून खुल्या गटातील बॉबी टिंगरे विरुद्ध दिनेश म्हस्के यांच्यात लढत होईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात टिंगरे यांनी १८३०७ मते मिळविली, तर म्हस्के यांना ८९९३ मतांवर समाधान मानावे लागले. टिंगरे यांनी ९३१४ चे मताधिक्‍य घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com