सोशल मीडियावर इच्छुकांचे ‘ब्रॅंडिंग’

सोशल मीडियावर इच्छुकांचे ‘ब्रॅंडिंग’

प्रचारात आधुनिक तंत्रावर भर; पॅकेजवर मोठा खर्च

पुणे - ‘संकल्प जनहिताचा, सर्वांगीण विकासाचा’, ‘याला म्हणतात विकास’, अशा खास शैलींमध्ये इच्छुकांच्या कार्याची व व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारे संदेश व गाणी ‘एलईडी स्क्रीन’वर झळकू लागले आहेत. ‘कव्हर’ फोटो, पक्षाचे चिन्ह आणि प्रभागाचा डीपी (डिस्प्ले पिक्‍चर) फेसबुक व व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून इच्छुकांनी जोरदार ‘ब्रॅंडिंग’ सुरू झाले आहे.

या निवडणुकीत प्रचारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यात येत आहे. पारंपरिकतेपेक्षा डिजिटल प्रचारावर भर दिला जात आहे. यापूर्वीचे कार्य, वैयक्तिक माहिती देण्यासाठी अनेक मीडिया एजन्सी, माहितीपटांची निर्मिती करणाऱ्या स्टुडिओंची मदत घेतली जात आहे. फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्रामवर प्रचाराचेही पॅकेज दिले जात असून, यावर मिळणाऱ्या ‘लाइक’वर इच्छुकांकडून गोळाबेरीज केली जात आहे. 

संबंधित एजन्सी, कंपन्याही ‘एक व्यक्ती-एक प्रभाग’ या तत्त्वाने काम करू लागल्या आहेत. संपादन, प्रचार संदेश करणे, छायाचित्र काढणे, व्हिडिओ अपलोड करण्यापासून ते प्रत्येक घडामोडीची माहिती सोशल मीडियावर पोचविण्याचे काम या एजन्सीकडून सुरू आहे. या आधुनिक प्रचाराकडे मतदारही आकर्षित होऊ लागले असून, त्यावर ‘होऊ दे खर्च’ अशी भूमिका इच्छुकांनी घेतली आहे. प्रचार यंत्रणेत इच्छुकांचे खास पोझमधले ‘फोटो’ आणि संदेश नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.  इच्छुक महिलादेखील यात पाठीमागे नाहीत. रंगीबेरंगी साड्या, उपरणे, पक्षाचे चिन्ह आणि संदेश त्यांच्याकडून दररोज सोशल मीडियावर अपलोड केले 
जात आहेत. 

‘डिजिटल’प्रचाराची वैशिष्ट्ये 
 कमी वेळेत लाखो लोकांपर्यंत पोचणे शक्‍य
 दृकश्राव्य पद्धतीमुळे मतदारांचे लक्ष आकर्षित करणे सोपे होते
 उमेदवार मतदारांच्या सतत डोळ्यांसमोर राहतो  
 उमेदवारांचा वेळ व श्रमात बचत होण्यास मदत
 पर्यावरणपूरक पद्धतीचा अधिकाधिक विचार

इच्छुकांद्वारे फेसबुक व व्हॉट्‌सॲपवरील प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे. संदेश, भेटी-गाठी, रॅली, विकासकामांची माहिती अपलोड करण्यासाठी त्यांनी सहा महिन्यांपासून आगाऊ नोंदणी केली आहे. निवडणुकीच्या प्रारंभापासून ते शेवटपर्यंत हजार ते लाखोपर्यंतचे ‘पॅकेज’ दिले जात आहे.
- प्रवीण पांगारे, सोशल मीडियातज्ज्ञ

महापालिका निवडणुकीत ‘डिजिटल’ प्रचाराचा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यात व्हॉट्‌सॲप, फेसबुक व्हर्जन, माहितीपट तयार करून ‘ब्रॅंडिंग’ केले जात आहे. तसेच ‘स्वच्छ भारत अभियाना’चा व पक्षाचे चिन्ह मतदारांच्या मनात ठसविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. इच्छुकांनी केलेले कार्य गाण्यांद्वारे मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
- विनय जवळगीकर, डिजिटल प्रचारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com