तिकिटापूर्वीच होऊदे खर्च!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

इच्छुकांकडून सांस्कृतिक कार्यक्रम, परदेश दौऱ्यासह भेटवस्तू

पुणे - महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळींना वेळ असला, तरी इच्छुकांमध्ये निवडणुकांचा रंग भरू लागला आहे. प्रभाग पद्धती आणि प्रचारासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेऊन इच्छुकांनी खेळ पैठणीचा, खेळ मांडीला आदी कार्यक्रमांतून मतदारांना आकर्षक भेटवस्तू देण्यास सुरवात केली आहे. नोटाबंदीमुळे ‘कॅश क्रंच’ आल्याने ऑनलाइन खरेदीचा नवा ट्रेंड या निवडणुकीत प्रथमच दिसत आहे. त्यामुळे मतदारांची निवडणुकीपूर्वीच चंगळ सुरू झाली आहे.

इच्छुकांकडून सांस्कृतिक कार्यक्रम, परदेश दौऱ्यासह भेटवस्तू

पुणे - महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळींना वेळ असला, तरी इच्छुकांमध्ये निवडणुकांचा रंग भरू लागला आहे. प्रभाग पद्धती आणि प्रचारासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेऊन इच्छुकांनी खेळ पैठणीचा, खेळ मांडीला आदी कार्यक्रमांतून मतदारांना आकर्षक भेटवस्तू देण्यास सुरवात केली आहे. नोटाबंदीमुळे ‘कॅश क्रंच’ आल्याने ऑनलाइन खरेदीचा नवा ट्रेंड या निवडणुकीत प्रथमच दिसत आहे. त्यामुळे मतदारांची निवडणुकीपूर्वीच चंगळ सुरू झाली आहे.

मतदारांपर्यंत पोचण्याच्या क्‍लृप्त्या
यंदाच्या निवडणुका चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने होणार आहेत. या महिनाअखेरपर्यंत आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. तिकिटासाठीची स्पर्धा, त्यातून तिकीट मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे आणि प्रत्यक्ष प्रचाराला सुरवात करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यानंतर प्रचारासाठी मिळणारा कालावधी लक्षात घेता, सर्व मतदारांपर्यंत पोचणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आत्तापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांपर्यंत पोचण्यास सुरवात केली आहे.

कार्यक्रमांबरोबरच भेटवस्तू
खेळ मांडीयला, खेळ पैठणींचा, लकी ड्रॉ याबरोबरच नवीन वर्षाचे निमित्त करीत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. एवढेच नव्हे, या कार्यक्रमांच्या निमित्ताने घरोघर अर्ज वाटप करून ते भरून घेतले जात आहेत. सहभागी प्रत्येकाला काहींना काही भेट वस्तूंचे वाटपही केले जात आहे.

परदेश दौरा अन्‌  कपडे
नोटाबंदीमुळे रोख वाटप करणे अवघड झाल्यामुळे घरगुती वस्तूंचे वाटप केले जात आहे. या महिन्यात वाढदिवस आलेल्या अनेक इच्छुकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मोफत तपासणी शिबिर, यात्रा आणि त्याच्या जोडीला कार्यकर्त्यांना कपडे शिवून देण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी पैसे दिले जात आहेत. कॅलेंडरचे वाटप, स्पर्धेतील विजेत्यांना दुबई, सिंगापूर ट्रीप आदी गोष्टींची आमिषे दाखविण्यास सुरवात झाली आहे. उपनगरात अशा कार्यक्रमांची मोठी रेलचेल असल्याचे सांगण्यात येत आहे.

इच्छुकांकडून दिले जातेय...
काही इच्छुकांनी थेट सोसायटी गाठून दहा वस्तू आणि ठराविक रकमेपर्यंत स्नॅपडिल, ॲमेझॉन आदी कंपन्यांकडून ऑनलाइन खरेदी करण्याची सुविधा मतदारांना उपलब्ध करून दिली आहे. 

काही उमेदवारांनी थेट दुकानदारांकडून महिनाभराचा किराणा घरपोच देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. 

डिशटीव्ही पॅकेज, मोफत जिओ कार्डचे वाटप, स्वस्तात भाजीपाला, आठवडाबाजार आदी कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांना आकर्षित करण्याचा धडका सध्या शहरात सुरू आहे.
बाणेर-बालेवाडी भागातील एका उमेदवाराने तर मतदारांना वाटण्यासाठी पाच आणि दहा ग्रॅमची सोन्याची वळी करून घेतल्याची चर्चा आहे.

मध्यवर्ती भागातील एका उमेदवाराने अशा कार्यक्रमांतून पाचशे कुकर, पाचशे भांडी, घड्याळे वाटप करून मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न केला. 
उपनगरातील एका उमेदवाराने तर चक्क दोनशे कार्यकर्त्यांना सिंगापूर ट्रीप घडवून आणली.

Web Title: interested candidate expenditure