पुणे भाजपमध्ये अंतर्गत खदखद

अमित गोळवलकर
बुधवार, 4 जानेवारी 2017

बापट यांनी "पक्षाचा झेंडा कुणाकडेही असेल तरी काठी मात्र आपल्याकडेच आहे,' असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांसमोरच केलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काठी आपल्याकडेच आहे, हे त्याच ठिकाणी आपल्या केवळ एका कृतीतून दाखवून दिलं होतं

महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना पुणे शहर भाजपमध्ये अंतर्गत खदखद सुरु आहे. आगामी निवडणुकीत चांगले यश मिळण्याची खात्री असतानाच पक्षांतर्गत वादामुळे पक्षाच्या यशाला काही प्रमाणात गालबोट लागण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. एकीकडे आपणच सर्वेसर्वा असल्याचे पालकमंत्री गिरीष बापट हे दाखवित असले; तरीही दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या काही विरोधकांना बळ देताना दिसत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात पुण्यासह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पुण्यात 80 पेक्षा जास्त जागा निवडून आणून सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पक्षाचे नेते पहात आहेत. पण बापट व त्यांच्या विरोधकांमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत "कोल्ड वॉर'चा परिणाम पक्षाच्या यशावर होऊ नये, यासाठी पक्षनेतृत्वाला कस लावावा लागणार आहे. मुंबईप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने पुण्याचीही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पुण्यासाठी आवर्जून वेळ देताना दिसत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे पुण्याचे खासदार झाले. त्यावेळी असलेली मोदी लाट विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली आणि शहराने सर्वच्या सर्व म्हणजे आठ आमदार भाजपचेच निवडून दिले. हे सगळेच आमदार आता आपापल्या कार्यक्षेत्रातले नेते बनले आहेत. बापट हे यातले सर्वात ज्येष्ठ. ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. वास्तविक लोकसभा निवडणुकीत पत्ता काटला गेल्याने बापट नाराज होते. मात्र, राज्यातली मोदी लाट जाणवू लागल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांची कळी खुलली. मात्र, आपण पहिल्या फटक्यातच मंत्री होणार हा मात्र त्यांचा भ्रम ठरला. 

त्यांना दुसऱ्या टप्प्यातल्या मंत्रीमंडळ विस्तारात अन्न व नागरीपुरवठा हे दुय्यम खाते देण्यात आले. सोबत संसदीय कामकाज मंत्रीपदही त्यांच्याकडे देण्यात आले. बापट हे नितीन गडकरी गटाचे आहेत. बापटांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा गडकरी यांचा प्रयत्न होता. पण पुण्यातल्याच काही जणांच्या प्रयत्नातून तो हाणून पाडला गेला. या साऱ्या राजकारणात बापट आणि त्यांच्या एकेकाळच्या समर्थकांमध्ये दरी पडली आहे आणि मुख्यमंत्री नेमके बापटांच्या आज विरोधात असलेल्यांना बळ देताना दिसत आहेत.

बापट यांना शह देण्यासाठी खासदार संजय काकडे यांना पुढे केले गेले. मधल्या काळात काकडे यांनी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा भाजपमध्ये प्रवेश करुन घेतला. त्यावेळी बापट आणि काकडे एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याचे चित्र होते. पण आता पक्षीय राजकारणात हळूहळू एकटे पडत असलेल्या बापट यांनी काकडेंशी जुळवून घेतल्याचे दिसते आहे. नंतरच्या काळातही पुण्यात अन्य पक्षांमधील काहीजण भाजपमध्ये आले. हे सर्व प्रवेश काकडे-बापट यांनी एकत्र येऊन घडवून आणल्याचे बोलले जाते.

आता महापालिकांच्या तिकिट वाटपाची भाजपची प्रक्रिया सुरु होईल. मधल्या काळात मंगळवार पेठेत एका झालेल्या कार्यक्रमात बापट यांनी "पक्षाचा झेंडा कुणाकडेही असेल तरी काठी मात्र आपल्याकडेच आहे,' असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांसमोरच केलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काठी आपल्याकडेच आहे, हे त्याच ठिकाणी आपल्या केवळ एका कृतीतून दाखवून दिलं होतं. त्या दिवशी राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाचा भाजप प्रवेश ठरला होता. मात्र, बापट यांनी त्या प्रवेशाला विरोध केला होता. ज्याने हा प्रवेश घडवून आणला तो बापटांचाच एकेकाळचा समर्थक. मुख्यमंत्र्यांनी त्याचाच सल्ला घेतला आणि बापटांच्या नाकावर टिच्चून भर कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या त्या ज्येष्ठ नगरसेवकाचा भाजप प्रवेश घडवून आणला.

मधल्या काळात आणखी काही पक्षप्रवेश झाले. पण त्यांचा पक्षाला फारसा उपयोग नसल्याचं बोललं जातं. उलट अशा प्रवेशांमुळे निष्ठावंत नाराज होतील आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल, ही भिती पक्षाचे कार्यकर्ते बोलून दाखवतात. आता कुणीही उठूनसुटून कुणालाही पक्षात प्रवेश देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक समितीच नेमली आहे. प्रत्येक प्रवेशाआधी संबंधितांची चारित्र्य पडताळणी पोलिसांच्या माध्यमातून करुनच मग प्रवेश देण्याचे निश्‍चित होते.

आता प्रत्यक्ष तिकिटवाटपांच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यावेळी पक्षाची खरी कसोटी लागणार आहे. यावेळी शहराच्या आठ विधानसभा मतदारसंघात पक्षाचे आठ आमदार आहेत. दोन खासदार शहरात आहेत त्या सर्वांच्या विचाराने उमेदवारी द्यावी लागणार आहे. आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचे पत्ते कापण्याच्या हालचाली आतापासूनच सुरु झाल्या आहेत. पण "80 प्लस'चे उद्दिष्ट ठेवलेले मुख्यमंत्री कुणाला किती भीक घालतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

पुण्यात संजय काकडेंच्या रुपाने नवे सत्ताकेंद्र होऊ पाहते आहे, अशीही एक चर्चा माध्यमांमध्ये ऐकायला मिळते. पण ती तितकीशी खरी नाही. किमान पुण्यात तरी मोतीबागेतून अनेक सूत्रे हालतात. तिथे बसणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा अजूनही शहर भाजपवर वरचष्मा आहे आणि काकडे यांना मोठे व्हायचे असेल तर त्यांना मोतीबागेचा आशिर्वाद लागेल. काकडे यांची देहबोली, भाषा आणि एकूणच प्रतिमा लक्षात घेता मोतीबाग त्यांना जवळ करेल असे अजिबात वाटत नाही. मध्यंतरी काकडे यांनी म्हणे मोतीबागेत जाऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आपण या निवडणुकीत आपल्या 80 सीट्‌स बसविणार असे काहीसे वक्तव्य काकडे यांनी तिथल्या पदाधिकाऱ्यांसमोर केल्याची चर्चा आहे. संघाचे पदाधिकारी अशा उथळपणाला थारा देतील हे अशक्‍य आहे.

एकूणच मुख्यमंत्री या सगळ्यात किती ठाम भूमिका घेतात, हे पहायचे. सध्यातरी मुख्यमंत्री नो-नॉनसेन्स पद्धतीने हालचाली करताना दिसताहेत. त्यात गडबड करायला फारसा कुणाला वाव त्यांनी ठेवलेला नाही. तरीही आपले महत्त्व वाढविण्याच्या उचापती सुरुच राहिल्या तर मात्र भाजपच्या सत्तास्थापनेच्या वाटेत त्यांच्याच पक्षातले काटे बोचल्याशिवाय राहणार नाहीत.

Web Title: Internal Conflict in Pune BJP