नवीन विमानतळ ५ जिल्ह्यांना मध्यवर्ती

- उमेश शेळके
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

पुण्याहून ३५ किलोमीटर; रिंगरोडचा फायदा

पुणे - पुरंदरच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वारगेटपासूनचे अंतर केवळ ३५ किलोमीटर राहणार असल्याने आणि तीन मार्गांनी तेथे पोचणे शक्‍य असल्याने पुणेकरांची सोय होणार आहे. तसेच प्रस्तावित रिंग रोडमुळे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील रहिवाशांनाही तिथे सहज पोचता येणार आहे.

पुण्याहून ३५ किलोमीटर; रिंगरोडचा फायदा

पुणे - पुरंदरच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वारगेटपासूनचे अंतर केवळ ३५ किलोमीटर राहणार असल्याने आणि तीन मार्गांनी तेथे पोचणे शक्‍य असल्याने पुणेकरांची सोय होणार आहे. तसेच प्रस्तावित रिंग रोडमुळे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील रहिवाशांनाही तिथे सहज पोचता येणार आहे.

नियोजित विमानतळाच्या परिसराची ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने नुकतीच पाहणी केली. त्यात ही जागा पुण्याप्रमाणेच अन्य जिल्ह्यांतील नागरिकांनाही सोयीची पडणार असल्याचे स्पष्ट झाले. पुरंदर तालुक्‍यातील राजेवाडी, पारगाव परिसरांतील जागा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्‍चित झाली आहे. सोलापूर आणि सासवड रस्त्याच्या दरम्यान विमानतळ होईल.

शिवाजीनगर एसटी स्थानकापासून हडपसरमार्गे सासवड चौकापर्यंतचे अंतर हे ४५ किलोमीटर आहे. सासवड चौकातून डाव्या बाजूस वळल्यानंतर अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर एखतपूर त्यापुढे पारगाव येते. पुण्यातून हा सर्वांत जवळचा मार्ग ठरेल. 

सोलापूर रस्त्यावरूनही मार्ग 
सोलापूर रस्त्याने उरुळीकांचन येथून राजेवाडीला फाटा फुटतो. उरुळीकांचन येथून १७ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. शिवाजीनगर ते उरुळीकांचन ३० किलोमीटर आणि तेथून राजेवाडी १७ किलोमीटर अंतर आहे. हे अंतर दोन किलोमीटरने अधिक असले, तरी सोलापूर रस्ता सहापदरी असल्यामुळे कमी वेळात हे अंतर कापता येईल.

खेड-शिवापूरमार्गे ५८ कि.मी. 
सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाक्‍याअलीकडील बाजूने खेडशिवापूर-सासवड लिंक रोडचा पर्याय आहे. पुण्यापासून खेड-शिवापूर हे अंतर २६ किलोमीटर आहे, तर तेथून कासुर्डी, वारवडी, गराडे कोडीत मार्गे सासवड हे अंतर २२ किलोमीटर आहे. तेथून दहा किलोमीटर अंतरावर पारगाव आहे. साधारणपणे या मार्गाने विमानतळ हे ५८ किलोमीटर अंतरावर पडेल. 

पर्यायी मार्ग उपलब्ध होणार
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंग रोड झाल्यावर विमानतळासाठी आणखी पर्यायी मार्ग उपलब्ध होतील. हा मार्ग विकसित झाल्यानंतर नगर, सोलापूर, सातारा, मुंबई हे रस्ते जोडले जातील. हा रिंग रोडही विमानतळाच्या जवळून जाईल. त्यामुळे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील नागरिकांना विमानतळ जवळ आहे.

Web Title: international airport in pune district