आम्ही जरी डावखुरे... तरी ना अधुरे!

सुवर्णा येनपुरे-कामठे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कॉलेजमध्ये असताना खुर्चीला फळीवजा बेंच असायचा. तो उजव्या बाजूला असायचा. त्यामुळे डाव्या हाताने लिहायला खूप त्रास व्हायचा. मी जेव्हापासून मेडिकल प्रॅक्‍टिस करायला सुरवात केली, तेव्हा खूप अडचणींचा सामना करावा लागला. पण, नंतर हळूहळू शिकले. मी अजूनही सर्जरी डाव्या हातानेच करते. 
- डॉ. तनुश्री थिटे-देशपांडे, स्त्रीरोगतज्ज्ञ

पुणे - ‘डावखुरे असल्यास उजवा मेंदू क्रियाशील असतो. यामुळे गणित, फिजिक्‍स अशा विषयांमध्ये मला गती होती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मी सर्वांत जास्त अडचणींना सामोरे गेले. कारण सर्व यंत्रणा, उपकरणे ही उजव्या हाताने वापरता येतील, अशीच असायची. प्रात्यक्षिके करताना अडचणी यायच्या. पण, नंतर अडचणींवर मात करीत दोन्ही हातांनी मी सक्षम झाले...’’

...अवकाश तंत्रज्ञान संशोधक लीना बोकील सांगत होत्या. त्या डावखुऱ्या. डावखुरे असणे यात गैर असे काहीच नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. त्यांच्याशी संवाद साधण्याचे निमित्त म्हणजे उद्या (ता. १२) जगभरात साजऱ्या होत असलेल्या डावखुरे दिनाचे.     

जगभरात ७ ते १० टक्के लोक डावखुरे आहेत. डावखुऱ्या लोकांबाबत व दैनंदिन कामात डाव्या हाताच्या वापराबाबत असणाऱ्या बऱ्याचशा अंधश्रद्धा अलीकडे दूर झाल्या असल्या, तरी अजूनही डावखुऱ्या लोकांना ऑफिस, शाळा, कॉलेज, कारखाना, सैन्यदल अशा ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा वापरात असलेली साधने; जसे की संगणक, यंत्रे ही उजव्या हाताचा वापर करणाऱ्या लोकांना वापरता येतील, अशा पद्धतीने डिझाइन केलेली असतात. त्यामुळे डावखुऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जाते.

याबाबत असोसिएशन ऑफ लेफ्ट हॅंडर्सचे अध्यक्ष बिपीनचंद्र चौगुले म्हणाले, ‘‘काही लहान मुले स्वतःहून डाव्या हाताने लिहायला किंवा कामे करायला लागतात. अशा वेळी उजव्या हाताने काम करावे, असा आग्रह कुटुंबीय, शिक्षक करतात. परंतु, हे चुकीचे आहे. त्यांचा डावा हात जन्मतः सक्षम असूनही उजव्या हाताचा वापर सक्तीने करावा लागल्याने त्यांच्या मेंदूवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे मुले ज्या हाताचा वापर सहजतेने करतात, ते स्वीकारले पाहिजे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Left Day