संस्कृतप्रेमी आयटीयन्सचा नाटकरूपी कलाविष्कार

पीतांबर लोहार  
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पिंपरी - ते सर्व जण वेगवेगळ्या प्रांतांतील... कुणी पंजाबी, कुणी बंगाली... कुणी गुजराथी, कुणी राजस्थानी... कुणी बिहारी, कुणी पुणेरी... कुणी तेलगू तर कुणी केरळी... प्रत्येकाची भाषा वेगळी... संस्कृती वेगळी... पण, या संस्कृतीलाच हजारो वर्षांपासून एका धाग्यात घट्ट बांधून ठेवणाऱ्या संस्कृतच्या प्रेमापोटी ते एकत्र आले आणि संस्कृतचे अध्ययन सुरू झाले. 

पिंपरी - ते सर्व जण वेगवेगळ्या प्रांतांतील... कुणी पंजाबी, कुणी बंगाली... कुणी गुजराथी, कुणी राजस्थानी... कुणी बिहारी, कुणी पुणेरी... कुणी तेलगू तर कुणी केरळी... प्रत्येकाची भाषा वेगळी... संस्कृती वेगळी... पण, या संस्कृतीलाच हजारो वर्षांपासून एका धाग्यात घट्ट बांधून ठेवणाऱ्या संस्कृतच्या प्रेमापोटी ते एकत्र आले आणि संस्कृतचे अध्ययन सुरू झाले. 

आयटीतील नोकरी सांभाळून सुटीच्या दिवशी संस्कृतची बाराखडी गिरविण्याचा ध्यास घेतलेली ही तरुणाई. मित्रमंडळीसह कुटुंबीयांची त्यांना साथ मिळाली. पाच वर्षांच्या चिमुकल्यांसह पन्नास वर्षांच्या वडिलधाऱ्यांनाही संस्कृत आवडू लागली आणि आंतरराष्ट्रीय संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृतमधूनच छोटेखानी कार्यक्रम सादर करण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्यासाठी सर्वांनी मिळून नाटिका, गाणे, नृत्य सादर करण्याचे आणि व्याख्यान देण्याचे ठरले. त्यासाठी वेगवेगळे गट तयार केले. स्वतःच संहिता लिहिली. चार लघुनाटिका लिहून झाल्या. त्या सादरीकरणासाठी तालमी सुरू झाल्या. रविवारी (ता. २६) त्या रंगमंचावर अवतरणार आहेत. छोटेखानी समारंभात. पिंपरीतील महिंद्रा रॉयल सोसायटीच्या छोट्या सभागृहात. संस्कृत गुरू पद्मनाभन परमभट यांच्या समोर. ‘गुरू एकमात्र रक्षक’, ‘चिकित्सालय’, ‘राजा और गुरू’ अशी नाटिकांची नावे आहेत. विनोद, विरह, प्रबोधन, वास्तवाच्या अनुषंगाने ‘गुरू हेच शिष्यांचे तारणहार’, ‘डॉक्‍टरांकडून रुग्णांची होणारी फसवणूक’, अहंकारी राजाचे गर्वहरण असा संदेश नाटिकांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. नंदा कुमार, नीतेश साह, अनूप मठकर, कार्तिक चंद्रशेखर आदींसह वनिता व गोपाल कोलूर, अनूपमा व सतीश जनार्धनन्‌, ज्योती व विजय अग्रवाल हे दांपत्यही अभिनय करणार आहेत. इंदिरा गोकुळकृष्णन्‌ आणि लता नम्मुद्री ‘लिंगास्टकम्‌’ गायन करणार आहेत. गुरू परमभट यांच्याकडून संस्कृतचे धडे घेतल्यानंतर वनिता कोलूर, अनुपमा जनार्धनन्‌, ज्योती अग्रवाल, अनूप मठकर यांनी इतरांनाही संस्कृत भाषा शिकविण्याचा विडा उचलला आहे. गायनानंतर संस्कृतचे महत्त्व सांगून संस्कृत गीतांवरच नृत्य सादर केले जाणार आहे. १९६९ पासून आंतरराष्ट्रीय संस्कृत दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त गुरू पद्मनाभन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करीत असल्याचे नंदाकुमार यांनी सांगितले. 

संस्कृतवर भाष्य...
नीतेश साह : हजारो वर्षांचा इतिहास असलेली ज्ञानभाषा.
अनुप मठकर : वेद आणि विज्ञानाचा संगम. 
वनिता कोलूर : सर्व भाषा आणि प्रांतांना जोडणारी भाषा.
सतीश जनार्धनन्‌ : आपल्यापेक्षा जास्त अभ्यास विदेशात.

Web Title: International Sanskrit Day Special