योगातून ‘करिअर’ची साधना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

पुणे - योगशास्त्र हा भारतीय मुलांसाठी नवीन ‘करिअर ऑप्शन’ म्हणून पुढे येत आहे. भारतीय योग शिक्षकांना जगभरातून मागणी वाढत असल्याने पुण्यातील झोपडपट्टीत राहणारी मुलेही स्वतःच्या कर्तृत्वावर आता हाँगकाँग, व्हिएतनाम, सिंगापूर, जर्मनी, चीन अशा देशांमध्ये योगाभ्यासाचे धडे तेथील नागरिकांना देत आहेत.

पुणे - योगशास्त्र हा भारतीय मुलांसाठी नवीन ‘करिअर ऑप्शन’ म्हणून पुढे येत आहे. भारतीय योग शिक्षकांना जगभरातून मागणी वाढत असल्याने पुण्यातील झोपडपट्टीत राहणारी मुलेही स्वतःच्या कर्तृत्वावर आता हाँगकाँग, व्हिएतनाम, सिंगापूर, जर्मनी, चीन अशा देशांमध्ये योगाभ्यासाचे धडे तेथील नागरिकांना देत आहेत.

पाच वर्षांपासून जगभरात २१ जून ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. पाच वर्षांमध्ये योगशास्त्राचा अभ्यास हा एक नवीन करिअरचा पर्याय म्हणून तरुणांपुढे येत आहे. एक वेळचे जेवण कसेबसे मिळत असलेल्या पुण्यातील झोपडपट्ट्यांतील मुलांनी चिकाटीने योगशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. त्यासंदर्भातील वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. त्यातून ही मुले आता वेगवेगळ्या देशांमध्ये योग शिक्षक म्हणून तेथील नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.

याबद्दल बोलताना योगतज्ज्ञ डॉ. पल्लवी कव्हाणे म्हणाल्या, ‘‘झोपडपट्टीत राहणारी मुले योगासनाच्या सरावासाठी माझ्याकडे येत होती. शाळा-कॉलेजचे शिक्षण घेतानाही त्यांची योगासनातील आवड कायम राहिली. त्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रातील वेगवेगळे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले. भारतातील योग शिक्षकांना जगभरात महत्त्व आहे.

योगशास्त्र हे भारतीय लोकांकडूनच जास्त चांगल्या प्रकारे शिकविले जाईल, असा विश्‍वास आहे. त्यातून भारतीय योग शिक्षकांना जगभरात मागणी आहे.’’ सध्या परदेशात योगाचे धडे देणारी ही मुले सरावासाठी महाराष्ट्र मंडळात येत असत. त्यांची अशी परिस्थिती नव्हती, की ते एकवेळचे जेवण करू शकतील. पण, ते आज परदेशात एक ते दीड लाख रुपये वेतन घेतात, असेही डॉ. कव्हाणे यांनी स्पष्ट केले.

योगसाधनेतून प्रसन्नता वाढली 
वयाच्या साठीनंतर योगसाधनेकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला आपल्याला या वयात सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम जमेल का, असे वाटले. मात्र, चिकाटीने करीत गेलो. शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारले. निरामय आरोग्यासाठी तरुणांनी योगाभ्यासाकडे वळावे.
- अनिलकुमार महिंद्रकर 

...आणि जीवन समृद्ध झाले
योग शिकायला सुरवात केली ते आरोग्यसंवर्धनासाठीच. अस्थमा, उंबरठ्यावर असलेला मधुमेह, वाढलेले वजन, गुडघेदुखी यातून सुटका करण्यासाठी योगासनाकडे वळाले. मी २००५ मध्ये भारतीय योग संस्थांशी जोडले गेले. योगासनात सातत्य ठेवल्याने व्याधी पळाल्या. जीवन समृद्ध झाले.
- जयश्री धनोकर, योग शिक्षिका

पूरक उपचारपद्धती
भारतामध्ये असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे. ६० टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंख्या उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू आजारांमुळे ग्रस्त आहे. २१व्या शतकातील तणावपूर्ण जीवनशैलीपासून उद्‌भवणाऱ्या आधुनिक आजारांकरिता पूरक उपचारपद्धती म्हणून योगपद्धतीकडे पाहिले जाते. 
- डॉ. राहुल आर. बागले, मानसोपचारतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Yoga Day