लोखंडी सळ्या कोसळून कामगार जखमी

लोखंडी सळ्या कोसळून कामगार जखमी

मांजरी : रेल्वे उड्डाणपूलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्डयात पडून तरूणाच्या झालेल्या मृत्यूला आठवडाही उलटला नसताना काल (ता. 20) रात्री लोखंडी सळ्या उभारताना सुरक्षेची काळजी न घेतल्याने झालेल्या अपघातात चार-पाच कामगार जखमी झाले आहेत. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला आहे. मात्र, ठेकेदाराकडून येथे काहीच घडले नसल्याचे सांगून घटना झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला. 

मांजरी बुद्रुक रेल्वेगेट क्रमांक तीनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. शनिवारी रात्री काम सुरू असताना पुलाचा खांब उभा करण्यासाठीच्या लोखंडी सळ्या कामगार उभारत होते. त्याचा सांगाडा न पेलावल्याने खड्यात कोसळला. त्यामध्ये चार ते पाच कामगार जखमी झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. तेथे रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता सांगाडा कोसळलेला दिसत होता.

काही कामगार खड्डयाभोवती बसून होते. साईट सुपरवायझर तेथे उपस्थित होता. त्याला विचारले असता काहीच घडले नसल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्याचवेळी काही कामगार व नागरिकांनी चार-पाच जणांना दवाखान्यात उपचारासाठी पाठविले असल्याचे सांगितले. त्यानंतर सुपरवायझर व कामगार तेथून निघून गेले. पाहाटे पुन्हा त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, सांगाडा यंत्राच्या साह्याने वर उचलून बांधून ठेवलेला दिसला. 

याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप-अभियंता नकुल रणसिंग म्हणाले, "सांगाडा कोसळल्याची घटना खरी असून त्यामध्ये दोन कामगार किरकोळ जखमी झालेले आहेत. ठेकेदाराला सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे सांगितले होते. तरीही असा प्रकार का घडला, याबाबत माहिती घेतली जात आहे.''

मागच्या आठवड्यात मांजरी गावाच्या बाजूने घेतलेल्या खड्ड्यात पडून सतीश पिसे या तरूणाला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच अलीकडील गोपाळपट्टीच्या बाजूला घेतलेल्या खड्ड्यात सळ्यांचा सांगाडा कोसळून कामगार जखमी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठेकेदाराकडून निष्काळजीपणे काम केले जात असून त्याचे कंत्राट त्वरीत काढून घ्यावे, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com