सिध्देश्वर निंबोडीत अंगणवाडी ओढ्याच्या हद्दीत विकास कामाच्या निधीतही अनियमितता

संतोष आटोळे
बुधवार, 25 एप्रिल 2018

विकासकामांमध्ये रमाई घरकुल योजनातील घरे अतिक्रमण हद्दीत बांधने, मागासवर्गीय निधीतून बसविण्यात आलेले एलईडी दिवे तीन महिन्यातच बंद पडले आहेत.

शिर्सुफळ - सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे गावठाणात बांधण्यात आलेली अंगणवाडी ओढ्याच्या हद्दीत आहे. तसेच गावातील विविध कामांच्यासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीमध्येही अनियमितता आहे. याबाबत माहिती अधिकारात माहिती देण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे या सर्वांची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ संतोष सोनवणे यांनी केला आहे.

एकात्मिक बालविकास योजना बारामती प्रकल्प दोन अंर्तगत अंगणवाडी इमारत बांधण्यात आली. मात्र सदर इमारत बांधण्यात आलेली जागा ओढ्याच्या हद्दीत आहे. याबाबत संबंधितांना अनेक वेळा तक्रारही देण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करुन काम पूर्ण करीत कामाचे पैसे संबंधित ठेकेदारला अदा करण्यात आले आहे. यामुळे सदर निधी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून वसुल करण्यात यावा. गावांमधील विकासकामांमध्ये रमाई घरकुल योजनातील घरे अतिक्रमण हद्दीत बांधने, मागासवर्गीय निधीतून बसविण्यात आलेले एलईडी दिवे तीन महिन्यातच बंद पडले आहेत. तसेच गावातील पाणी शुध्दीकरण यंत्रणेच्या दुरूस्तीचे काम कोटेशन न मागवताच जवळच्या ठेकेदारला दिले गेले आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मुलांचे आरोग्य धोक्यात - संतोष सोनवणे
अंगणवाडी ज्या परिसरात बांधण्यात आली आहे. त्यापासुन जवळच सार्वजनिक शौचालय आहेत. याचा त्रास अंगणवाडीतील मुलांना होणार आहे. यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

दोन दिवसात अहवाल देणार - खांडेकर (विस्तार अधिकारी पंचायत समिती बारामती) याबाबत आलेल्या तक्रारी नुसार ग्रामपंचायतीच्या कामकाजाची व खर्चाची चौकशी केली आहे. दोन दिवसात वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार आहे.    

सर्व कामे व निधी नियमानुरुप - रंजना आघाव (ग्रामसेवक)
गावांमध्ये बांधण्यात आलेली अंगणवाडी ही तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सर्वानुमते केलेल्या ठरावानुरुप बांधण्यात आलेली आहे. याबाबत संबंधित विभागाकडून नियमानुरुप कार्यवाही करण्यात आलेली. तसेच इतर कामांसाठी शासकीय नियमानुरुप निधी खर्च केला जाईल. पाणी शुध्दीकरण यंत्रणेची पंधरा दिवस चाचणी घेऊनच बिल अदा केले जाईल.

विकासकामात अडचणी आणण्याचा प्रयत्न - मनिषा फडतरे (सरपंच) व नितीन विधाते (उपसरपंच)
गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी निधी येत आहे. तसेच पाणी फाउंडेशनची कामेही जोमात सुरु आहेत. याबाबत विरोधकांनी केलेले आरोप निराधार आहेत. सध्या सुरु असलेली कामे नियमानुरुप होत आहेत. केवळ प्रसिध्दीसाठी असे आरोप केले जात आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irregularities in the funding of development work in Siddheshwar Nimbodit Anganwadi rivulet