‘पाटबंधारे’कडून केवळ नोटिसांचा फार्स

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

दोषींवर केवळ कागदोपत्री कारवाई
धायरी येथील कालव्यालगत टॅंकरमध्ये पाणी भरण्यासाठी वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महावितरणने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरवात केली होती. याप्रकरणी अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. तसेच, संबंधितांना दंडासह वीजबिल भरण्याची नोटीस दिली होती. त्याचे पुढे काय झाले, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे ही कारवाई कागदोपत्री झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

पुणे - धायरी येथील मुठा उजवा कालव्यालगत ३५ मीटर अंतराच्या आत तीन विहिरी असून, त्यातून टॅंकर भरून पाण्याची विक्री केली जात असल्याची कबुली पाटबंधारे खात्याने दिली आहे. मात्र, असे असतानाही या विहीरमालकांना केवळ नोटिसा देण्यापलीकडे खात्याने कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. यावरून पाणीचोरीला खात्याकडून आशीर्वाद असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

धायरी येथे कालव्यास भगदाड पाडून आणि पाइप टाकून पाणीचोरी होत असल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. त्यासाठी वीजचोरी देखील होत असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत ‘सकाळ’ने पाठपुरावा केल्यानंतर महावितरणने संबंधित वीजजोडांवर कारवाई केली होती. मात्र, कालव्याच्या भरावापासून ३५ मीटरच्या अंतराबाहेर या विहिरी असल्याचे कारण देत पाटबंधारे खात्याने हात वर केले होते. या सर्व प्रकरणात पाटबंधारे खात्याने काय कारवाई केली, याची विचारणा माहिती अधिकारात महेंद्र धावडे यांनी केली होती. त्यावर पाटबंधारे खात्याने दिलेल्या माहितीवरूनही ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कालव्याच्या भरावभिंतीपासून ३५ मीटरच्या अंतरातील जमीन जलसंपदा विभागाच्या संपादित क्षेत्रात येते.

त्यामुळे ३५ मीटरच्या आत विहीर असेल, तर अशा विहिरींवर कारवाई करण्याचा अधिकार पाटबंधारे खात्याला आहे. धायरी येथील पाणीचोरी उघडकीस आल्यानंतर खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखाधिकारी आणि कालवा निरीक्षक यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली होती. त्यांनी दिलेल्या अहवालात तीन विहिरी कालव्याच्या भरावभिंतीपासून ३५ मीटरच्या आतील जागेत असल्याचे आणि त्या विहिरीतून पाण्याची टॅंकरद्वारे विक्री होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून संबंधित विहिरीच्या मालकांना पाटबंधारे खात्याने पाणीउपसा बंद करण्याची नोटीस दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही, असे उत्तर पाटबंधारे खात्याने दिले आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाण्याचा उपसा अद्याप सुरू असल्याचे स्थानिक रहिवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यामुळे पाणीचोरांना पाटबंधारे खात्याचा आशीर्वाद असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrigation Notice Water Tanker Crime