#वेठबिगारी : वेठबिगारीचा कलंक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

एकीकडे वेठबिगारी हद्दपार झाल्याचा दावा सरकार करीत आहे, तर दुसरीकडे परप्रांतीय मजुरांना येथे आणून त्यांना वेठबिगारीला जुंपले जात असल्याचे वास्तव शिरूर तालुक्‍यातील घटनेवरून सिद्ध झाले आहे.

पुणे - एकीकडे वेठबिगारी हद्दपार झाल्याचा दावा सरकार करीत आहे, तर दुसरीकडे परप्रांतीय मजुरांना येथे आणून त्यांना वेठबिगारीला जुंपले जात असल्याचे वास्तव शिरूर तालुक्‍यातील घटनेवरून सिद्ध झाले आहे. तालुक्‍यातील आलेगाव पागा येथून नुकतीच उत्तर प्रदेशातील १७ मजुरांची वेठबिगारीतून जिल्हा प्रशासनाने सुटका केली.

मदतीची मागणी
मुक्‍ततेनंतर मजुरांना २० हजार रुपयांची प्राथमिक मदत मिळावी. तसेच ही मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधी उभारावा, अशी मागणी अंगमेहनती समितीचे निमंत्रक नितीन पवार, चंदन कुमार, हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोरख मेंगडे, अर्जुन लोखंडे आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.

अशी झाली सुटका 
आलेगाव पागा येथे १७ मजुरांकडून वेठबिगारी करून घेत असल्याची माहिती अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीला मिळाली. त्यानुसार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खातरजमा करून कार्यवाही केली. यासाठी शिरूरमधील लोकशाही क्रांती आघाडी व हमाल पंचायतीचीही समितीने मदत घेतली. सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून तहसील व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर लागलीच चक्रे फिरली आणि १७ मजुरांची वेठबिगारीतून सुटका केली.

सुटकेनंतर प्रमाणपत्र
केंद्रीय वेठबिगार प्रथा निर्मूलन  आणि पुनर्वसन योजनेनुसार वेठबिगार मुक्तता प्रमाणपत्र आवश्‍यक असते. ज्या जिल्ह्यातून वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली आहे, तेथील जिल्हाधिकारी हे प्रमाणपत्र देतात. ते दिल्यावर वेठबिगारांच्या मूळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांना पुनर्वसनासाठी केंद्रीय योजनेतून निधी वितरित करतात. आलेगाव पागा येथे आढळलेल्या वेठबिगारींची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तत्काळ दखल घेत त्यांना प्रमाणपत्र दिले.  

कायदा आहे; पण...
वेठबिगारी हद्दपार करण्यासाठी १९७६ मध्ये कायदा करण्यात आला. तत्पूर्वी देशातील दहा राज्यांत केंद्र सरकारकडून पाहणी करण्यात आली. त्यात २६ लाख वेठबिगार आढळून आले होते. त्यानंतर १९७८ मध्ये १६ राज्यांत केलेल्या पाहणीत अवघे साडेतीन लाख वेठबिगार आढळल्याचा दावा सरकारने केला होता. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने मात्र हे सरकारी आकडे खोटे ठरवीत देशात अजूनही एक कोटींहून अधिक वेठबिगार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वेठबिगार निर्मूलन कायद्याच्या परिणामतेविषयी अद्यापही कामगार क्षेत्रातून साशंकता व्यक्त केली जात आहे.

येथे आढळतात वेठबिगार
  शेती
  दगडफोड
  वीटभट्टी
  खाणकाम
  गोठे,
तबेले
  बिडी
कारखाने
  छोटे
कारखाने


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Issue of forced labor in pune