इच्छा नाही; पण स्वच्छतागृह साफ करावंच लागतं!

issues faced by sewage workers in Pune
issues faced by sewage workers in Pune

पुणे : "कामधंद्याच्या शोधात पुण्यात आलो होतो. इथे आल्यावर राहण्याची कुठलीच सोय नव्हती. कुटुंबाला कुठे ठेवायचे हा प्रश्‍न होता. तेव्हा स्वच्छतागृह साफ केल्यास त्याच्यावर राहायला जागा मिळेल म्हणून हे काम करायला लागलो. गेल्या 15 वर्षांपासून हेच काम करत आहे. इच्छा नाही, पण करावे लागते...' शिवराम पाटोळे या शौचालय साफ करणाऱ्या व्यक्तीची ही व्यथा. 

जागतिक स्वच्छतागृह दिनानिमित्त शहरातील जनता वसाहत, वारजे माळवाडी, मंगळवार पेठ, ताडीवाला रोड, भवानी पेठ, काशेवाडी आदी ठिकाणच्या झोपडपट्टी भागामधील सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करणाऱ्या काही कुटुंबांशी संवाद साधला असता, असे वास्तव दिसून आले. स्वच्छतागृहे साफ करणारी शेकडो कुटुंबे स्वच्छतागृहांवर राहात आहेत. स्वच्छतागृह साफ केल्यावर ते वापरणाऱ्या कुटुंबांकडून महिन्याला प्रत्येकी 30 रुपये मिळतात. त्यातून देखभाल दुरुस्तीचा खर्च वजा जाता, उर्वरित रकमेवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. 

स्वच्छतागृहावरच राहात असल्यामुळे सतत दुर्गंधी असते. यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. पण दुसरा पर्याय नसल्यामुळे राहावे लागते, असे या कुटुंबांचे म्हणणे आहे. आम्ही काम जरी स्वच्छतेचे करत असलो तरी बाहेर सांगायला लाज वाटते. लोक खालच्या नजरेने पाहतात. त्यामुळे नातेवाइकांना घरी बोलावता येत नाही. तसेच मुला-मुलींची लग्न जमविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे अनेक कुटुंबांनी सांगितले. 

स्वच्छतेची जबाबदारी घेणाऱ्यांना तुच्छतेने वागवले जाते. याला जातिप्रथा कारणीभूत आहेच; पण त्याचबरोबर आपली घाण काढणाऱ्यांना हीन वागणूक देणारा प्रशासनाचा आणि सरकारचा दृष्टिकोन अजिबात योग्य नाही. आपल्याला यामध्ये बदल करायला हवा, याचे भान मात्र अजून आपल्याला नाही. 
- मुक्ता मनोहर, ज्येष्ठ कामगार नेत्या 

शौचालयाच्या दुर्गंधीमुळे कावीळ, मलेरिया या प्रकारचे संसर्गजन्य आजार होण्याची शक्‍यता असते. अशा दुर्गंधीच्या भोवती राहिल्यामुळे सततचा खोकला, भूक न लागणे, अपचन होणे आदी प्रकारचा त्रास होऊ शकतो. 
- डॉ. स्वरूप लडकत, एमडी होमिओपॅथी 

वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी नोकरीच्या शोधात गाव सोडले. इथे येऊन असे काम करावे लागले. त्यांची मजबुरी होती. पण आता मी शिक्षण घेत आहे. पुढे जाऊन काही झाले तरी असले काम आम्ही करणार नाही. 
- शुभम नाईकनवरे, सफाई कामगाराचा मुलगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com