‘आयटी’ उद्योगाच्या मिळकतकरासाठी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

पुणे - शहरातील माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या कंपन्यांकडील सर्व थकबाकी लगेचच वसूल करण्यासाठी थकबाकीदार कंपन्यांना जप्तीची तंबी दिली आहे. महापालिका प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे राज्य सरकारने दिलेले मिळकतकराच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठणे शक्‍य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनेकदा मोहीम राबवूनही ‘आयटी’ कंपन्यांकडील थकबाकी वसूल होत नसल्याचे स्पष्ट झाले. याआधी दारात ‘बॅंड’ वाजवून थकबाकी भरण्यास कंपन्या टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच, येत्या ३१ मार्चपर्यंत मिळकत कर आणि पाणीपट्टीची ९० टक्के वसुली करण्याची सूचना राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यासाठी शहरभर विशेष वसुली मोहीम राबविण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर ज्या मिळकतधारकांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे, त्यांच्या मिळकतींना सील करण्याची कार्यवाही महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने सुरू केली आहे. त्यापाठोपाठ व्यावसायिक मिळकत धारकांकडे लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडील थकबाकी वसूल करण्यावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून, ‘आयटी’ कंपन्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तरीही, थकबाकी न भरल्यास कंपन्यांना सील लावण्यात येणार असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.  

महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख सुहास मापारी म्हणाले, ‘‘मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात, व्यावसायिक विशेषत: ‘आयटी’ कपंन्यांकडील थकबाकी वसूल व्हावी, यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. या कंपन्यांकडे साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी आहे.’

Web Title: it business income tax campaign