आयटी कंपन्यांना नवी नियमावली लागू करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत अभियंता तरुणीचा खून झाल्यानंतर आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, आयटी कंपन्यांतील अंतर्गत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याबाबत नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यापैकी योग्य सूचना स्वीकारून आयटी कंपन्यांना नवी नियमावली लागू करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी बुधवारी दिली.

कंपनीतील वरिष्ठांनी रविवारी रसिला ओपी (वय २४, रा. केरळ) या तरुणीला एकटीलाच कामावर बोलावले होते. त्या वेळी तेथील सुरक्षारक्षक भाबेन सैकिया (वय २७, मूळ रा. आसाम) याने तिचा केबलने गळा आवळून खून केला होता. या घटनेमुळे आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर पोलिसांनी या पूर्वीही आयटी कंपन्यांना महिलांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या; परंतु या घटनेनंतर आयटी कंपन्यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीत रविवारी सुटी असूनही एकट्या महिला कर्मचाऱ्यालाच कामावर का बोलावण्यात आले, यासह विविध प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत.

या संदर्भात पोलिस आयुक्‍त शुक्‍ला म्हणाल्या, ‘‘ही घटना कंपनीच्या आवारात घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असून, तपास सुरू आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्या सूचनांबाबत विचार करून येत्या दोन-तीन दिवसांत आयटी कंपन्यांना नवीन नियमावली लागू करण्यात येईल.’’

टेरियर सिक्‍युरिटी सर्व्हिसेसविरुद्ध लवकरच गुन्हा
हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीमध्ये टेरियर सिक्‍युरिटी सर्व्हिसेसमार्फत सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. ही सिक्‍युरिटी एजन्सी बंगळूर येथील आहे. या एजन्सीने परवान्याचे नूतनीकरण केलेले नव्हते. तसेच, परवान्याच्या नूतनीकरणासाठी मुदतीत आवश्‍यक कागदपत्रे सादर केली नसल्याचे समोर आले आहे. या एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सह आयुक्‍त सुनील रामानंद यांनी दिली.

Web Title: IT companies will apply the new rules