कंपनीचे 2 कोटी 90 लाख चार दिवसांत परत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - हिंजवडीतील एका नामांकित कंपनीचा ई-मेल आयडी "मॅन इन मिडल अटॅक-हॅकिंग' या पद्धतीद्वारे हॅक करून कंपनीचे तब्बल दोन कोटी 90 लाख रुपये चीनमधील दुसऱ्याच बॅंकेच्या खात्यात वळवण्यात आले. ही बाब कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधला. पोलिसांच्या एका पथकाने चीनमधील पोलिस, बॅंकांशी संपर्क साधून, पाठपुरावा करत सर्व रक्कम अवघ्या चार दिवसांतच पुन्हा मिळविली.

वाहनांचे हेडलाईट बनविण्याचे काम करणारी हिंजवडीतील एक कंपनी विविध देशांकडून कच्चा माल मागविते. त्यानुसार, कंपनीने चीनमधील एका कंपनीस कच्चा माल घेण्यासाठी ईमेलद्वारे संपर्क केला. त्या वेळी दोन्ही कंपन्यांमध्ये आगाऊ रक्कम देण्याचे ठरले, त्यानुसार हिंजवडीतील कंपनीने दोन कोटी 90 लाख रुपये संबंधित कंपनीस ऑनलाईन पाठविले. त्यानंतर पाठपुरावा केला तेव्हा त्यांना रक्कम मिळाली नसल्याचे उघड झाले. कंपनीने 26 मे रोजी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, मनीषा झेंडे, सचिन गवते, शीतल वानखेडे यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली. त्या वेळी संबंधित रक्कम ही सायबर गुन्हेगारांनी बनावट ईमेलद्वारे चीनमधील दुसऱ्याच बॅंकेमध्ये वळवल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

..असे परत मिळविले पैसे !
तक्रारदार कंपनीच्या माहितीवरून चीनमधील बनावट ई-मेल धारकाच्या बॅंक खात्याची माहिती पुणे पोलिसांनी मिळविली. त्यानंतर चीनमधील ज्युझियांग शहरातील शेंग्जी पोलिस उपविभागातील युवी पोलिसांशी ई-मेलद्वारे संपर्क साधला. युवी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने पैसे जमा झालेल्या चिनी बॅंकेशी पत्रव्यवहार केला. भारतीय कंपनीच्या आर्थिक फसवणुकीतील रक्कम त्या बॅंक खात्यात असल्याचे ठोस पुरावेही पोलिसांनी संबंधित बॅंकेकडे सादर केले. या पाठपुराव्यानंतर संबंधित बॅंकेला फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी चार दिवसांनंतर दोन कोटी 90 लाख रुपयांची रक्कम परत केली. चिनी पोलिसांच्या सहकार्यामुळे पैसे परत मिळविणे शक्‍य झाले. पहिल्यांदाच फसवणुकीच्या गुन्ह्यातील सर्व रक्कम मिळाली आहे. या प्रकरणातील सायबर गुन्हेगारांचा शोध चिनी पोलिस घेत आहेत, असे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.

मॅन ईन मिडल अटॅक-हॅकिंग म्हणजे काय ?
सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या देशांतील कंपन्यांमध्ये होत असलेले खरेदी-विक्री, आयात-निर्यातविषयक व्यवहारांबाबतचे ईमेल संभाषण हॅक केले जातात. त्यानंतर रक्कम देणाऱ्या कंपनीला बनावट ई-मेल आयडी पाठवून मूळ कंपनीच ईमेल पाठवत असल्याचे भासवले जाते. यालाच "मॅन ईन मिडल अटॅक-हॅकिंग' असे म्हटले जाते.

Web Title: IT company 2 crore 90 lakh rupees return police